नवी मुंबई : रात्री अतिवृष्टीमुळे मोरबे धरणाजवळ खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीत दरड कोसळली. या ठिकाणी रात्री २.३० वाजता बचावकार्य करीत असताना नवी मुंबई महानगरपालिकेचे बेलापूर येथील अग्निशमन विभागातील सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम ढुमणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपले कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने नवी मुंबईत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. दरड या रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. यामध्ये १०० हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. यावेळी रात्री २.३०च्या सुमारास नवी मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते.
हेही वाचा – भंडारा : रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
हेही वाचा – नागपूर : गडकरी, फडणवीस आणि केशवचा चहा; काय प्रकरण आहे वाचा…
अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आले होते. मात्र या बचाव कार्यादरम्यान नवी मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी शिवराम ढुमणे यांना जीव गमवावा लागला आहे. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आले असून एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.