नेत्यांचा वाढदिवस आणि कार्यकर्त्यांचा अतिउत्साह
राज्याचे माजी मंत्री व नवी मुंबई राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा गणेश नाईक आणि कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील या दोन नेत्यांचे मंगळवारी वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना काय करू आणि काय नको, असे झाले आहे. आपल्या नेत्यांची मर्जी राखण्याच्या प्रयत्नांत या उत्साही कार्यकर्त्यांनी शहरात विनापरवानगी फलक लावण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांना धाब्यावर बसविले असल्याचे चित्र असून पालिका प्रशासनाची हाताची घडी आणि तोंडावर बोट आहे.
मुंबई शहरातील फलकबाजीबद्दल चिंता व्यक्त करताना न्यायालयाने राज्यातील सर्व पालिका, नगरपालिकांना बेकायदा फलकांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र नवी मुंबई पालिका प्रशासनाला याची जाणीव नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर मार्ग, मोक्याचे चौक, सिग्नल यावर नाईक व पाटील यांच्या अभीष्टचिंतनाचे फलक लागले आहेत. काही फलकांनी तर एनएमएमटीच्या बसथांब्यांचा कब्जा घेतला आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा येत असून पदोपदी हे फलक दिसून येत आहेत. यावर प्रभाग अधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे, मात्र एकाही प्रभाग अधिकाऱ्यामध्ये हे फलक हटवण्याचे धैर्य नाही.
तात्काळ कारवाई केली जाईल
बेकायदा फलक लावण्यावर न्यायालयाच्या आदेशाने बंदी आहे. त्यामुळे या फलकबाजीवर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. शहरात लागलेले हे फलक हटविण्यात येतील.
– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका