नवी मुंबई : करोनापूर्वी शहरात सुरू झालेले शेतकरी ते थेट ग्राहक सेवा देणारे भाजीपाला व फळांचे आठवडे बाजार शहरात पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना आता एपीएमसीसह या बाजारात स्वस्त भाजीपाला मिळण्याचे हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.करावे, सीवूड्स, बेलापूर, वाशी आदी ठिकाणी हे बाजार ठरलेल्या दिवशी भरत असल्याने आठवडाभराचा भाजीपाला नवी मुंबईकरांना स्वस्त व ताजा मिळत आहे.
एपीएमसीतील दलालांची मधली साखळी तोडून ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मदतीने शेतकरी ते ग्राहक ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत करोनापूर्वी नवी मुंबईत हे आठवडी बाजार सुरू करण्यात आले होते. मात्र करोना संकटानंतर ते काही दिवस बंद होते. आता पुन्हा या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल नवी मुंबईत आणून थेट विक्री सुरू केली आहे.
शहरात सध्या बेलापूर, सीवूड्स, वाशी, नेरुळ विभागात हे शेतकरी बाजार भरत असून शेतातली ताजी भाजी ग्राहकांना उपलब्ध होत आहे. काही प्रमाणात ग्राहकांकडून या बाजारांना प्रतिसाद मिळत आहे. मात्र भाजीपाला हा नाशवंत असल्याने विक्री न झाल्यास या शेतकऱ्यांचे नुकसानही होत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वस्त व ताजी भाजी हवी असेल तर या बाजारात भेट द्यावी अशी विनंती या शेतकऱ्यांनी केली आहे. सद्या नवी मुंबईत येणारा शेतीमाल हा पुणे जिल्ह्यातील सासवड, नीरा, भोर, आंबेगाव तालुक्यातून येत आहे.
बाजार कुठे व कधी?
सोमवार : तांडेल मैदानाबाहेर, करावे
मंगळवार : शबरी हॉटेल सेक्टर ९, १० वाशी
बुधवार : पेट्रोल पंपाजवळील मैदान, बेलापूर
गुरुवार : सेक्टर ६ एनबीएसए, वाशी
शनिवार : राजीव गांधी मैदान बेलापूर
रविवार : एनआरआय कॉम्पलेक्स जवळ, सीवूड्स
शेतकरी गटाद्वारे फळे स्थानिक शेतकऱ्यांकडून घेऊन शहरात विक्रीसाठी आणतो. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी माल शिल्लक राहिला तरी संध्याकाळी शहरात विकला जाते. परंतु शेतकऱ्यांच्या मालाला अधिक उठाव आवश्यक आहे.
मोहन बोडके, शेतकरी, सासवडशेतातला ताजा व स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने चांगला प्रतिसाद आहे. परंतु यालाही खूप कष्ट असून अधिक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. – दीपक वाडघरे, शेतकरी भोर
शेतमाल थेट ग्राहकांना तोही स्वस्त दरात मिळत आहे. बाजारात भाजी, फळे खरेदी करता येतात. नवी मुंबई करांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. – रजनी पाटील, करावे.