पनवेल: शनिवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत पनवेल परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखलभागातील घरांमध्ये फूटभर पाणी शिरल्याने बैठ्या खोल्यांमध्ये राहणा-यांची तारंबळ उडाली. २६ जुलै २००५ च्या पुराची पुनरावृत्ती होण्याच्या भितीने तळमजल्यावर राहणा-यांमध्ये भितीचे वातावरण होते. परंतू सकाळी ११ वाजल्यापासून पावसाचा जोर कमी झाल्यानंतर घरातील पाणी ओसरु लागले. मात्र तोपर्यंत अनेक घरांमध्ये खाली ठेवलेले अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तू पाण्यात भिजले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेलमधील कळंबोली, तळोजा, पनवेल ग्रामीण, घोट, खारघर या परिसरात सखल भागात पावसाचे पाणी शिरले. घरांपेक्षा अधिक दोन ते चार फुट पाणी पनवेल परिसरातील सखल भागातील रस्त्यांवर होते. रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे रस्त्यांना पाण्याच्या पाटाचे रुप आले होते. पावसाळी पाणी वाहणारी गटारे पाणी तुडूंब झाल्याने आणि खाडीमध्ये भरती असल्याने पाणी गटारात साचून होते. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ‘औद्योगिक विकास महामंडळा’च्या सामायिक सुविधा कार्यालयात कंबरेभर पाणी साचले होते. तर शेकडो कारखान्यांमध्ये अर्धा ते एक फुट पाणी साचल्याने औद्योगिक उत्पादन संथगतीने तर काही कारखाने अतिवृष्टीमुळे बंद ठेवण्याची वेळ कारखानदारांवर आली.

हेही वाचा : मोरबे धरणातही यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक पाऊस! एका दिवसात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद

औद्योगिक विकास महामंडळाने नालेसफाई न केल्याने कारखान्यात पाणी शिरल्याचा आरोप उद्योजकांच्या संघटनेने केला आहे. पनवेल शहरातील कोळीवाडा हा परिसरालगत गाढीनदीवरील पुलाखाली पाणी लागले होते. हा पुल करंजाडे व उरण परिसराला पनवेल शहराला जाेडणारा असल्याने कोळीवाड्यातील रहिवासी अतिवृष्टीकडे लक्ष्य देऊन होते. १२१.६० मिलीमीटर एवढा पाऊस मागील २४ तासात पनवेलमध्ये पडल्याची नोंद हवामाना विभागाकडे नोंदविण्यात आली. पनवेलचे तहसिलदार विजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनूसार मोरबे गावात काही मिनिटांत सर्वाधिक पाऊस झाल्याने ग्रामस्थांची तारंबळ उडाली होती. २० घरांमध्ये पाणी शिरले. अशीच स्थिती पडघे गावातील प्रवेशव्दारावरील पुलाची होती.

हेही वाचा : नवी मुंबईत फ्लेमिंगों अधिवास विकसित करण्याचा निर्णय; प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती, वनमंत्री मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

कासाडी नदीवरील पडघे गावाचा पुल पाण्याखाली गेल्याने कामगारांना औद्योगिक वसाहतीमध्ये जाण्यासाठी जिवघेणा प्रवास करावा लागला. कामगार गुडघाभर पाण्यातून पुल ओलांडत होते. तळोजा पाचनंद रेल्वेरुळाखालील पुल पाण्याने भरला होता. पाचफुट पाणी साचल्याने अनेक वाहने येथे बंद पडत होती. शीव पनवेल महामार्ग कामोठे येथे तसेच तळोजा एमआयडीसी ते पनवेल अंतर्गत मार्ग व गावागावातील अंतर्गत मार्ग दोन फुट पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होती.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai heavy rain in panvel causes flood like situation css
Show comments