कोसळलेले स्लॅब, भेगाळलेल्या भिंती
वाशीतील आयसीएल हायस्कूल मोडकळीस आले असून त्यामुळे तिथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. १९८०मध्ये बांधण्यात आलेल्या या इमारतीत अनेक ठिकाणी स्लॅब कोसळले आहेत.
या तीन मजलीच्या इमारतीमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाचे पहिले ते दहावीचे वर्ग भरतात. त्यात एकूण १,३७६ विद्यार्थी शिकत आहेत. त्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे.
इमारतीची दुरुस्ती व देखभालीअभावी दुरवस्था झाली दिसून येत आहे. पत्रे फुटले आहेत, वर्गातील स्लॅब कोसळले आहे, भिंती पावसाचे पाणी मुरून कमकुवत झाल्या आहेत, त्या अनेक ठिकाणी फुगलेल्या आहेत. काही भिंतींना भेगा पडल्या आहेत. फरशा फुटल्या आहेत. पावसाळ्यात छत अनेक ठिकाणी गळते. एखाद्या वर्गात विद्यार्थी असताना स्लॅब कोसळल्यास त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
या शाळेची इमारत फार जुनी आहे. व्यवस्थापनाने गेल्या वर्षीच या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. इमारतीचे नूतनीकरण लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे.
–सुनीता मुसळे, मुख्याध्यपिका, आयसीएल हायस्कूल, वाशी