नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमात मागील काही वर्षात अपघातांची संख्या व मृत्यूमुखी होणाऱ्यांची संख्या घटली आहे. ही समाधानाची बाब आहे. परंतु दुसरीकडे पालिका परिवहन उपक्रमात जीसीसी तत्वावर चालवल्या जाणाऱ्या गाड्यावरील वाहनचालकांची संख्या मोठी असल्यामुळे मुंबईत झालेल्या बेस्ट उपक्रमाच्या अपघातानंतर खासगी तत्वावरील वाहनचालकांबाबत पालिकेने खबरदारी घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई महापालिका उपक्रमाच्या बसेसद्वारे मागील ८ वर्षात जवळजवळ १ हजार अपघात झाले असून आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. तर मागील दोन वर्षात अपघातांची संख्याही घटली आहे.

हेही वाचा…दोन पिस्तुलांसह तीघांना अटक

नवी मुंबई महापालिका उपक्रमात बसेसची संख्या सातत्याने वाढत असून दुसरीकडे डिझेल व सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या कमी करुन इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यावर पालिकेचा भर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या उपक्रमात जवळजवळ एकूण २८०० कर्मचारी आहेत. पालिकेकडील ४९८ बसगाड्यांपैकी जवळजवळ २०० बसेसवर जीसीसी तत्वावरील ६० टक्के म्हणजेच जवळजवळ ५४० ठोक मानधनावरील वाहनचालक कार्यरत आहेत. परंतु त्यामध्ये पालिका आपले प्रशिक्षित वाहनचालक देत असल्याचे पाहायला मिळते. नवी मुंबई महापालिकेच्या उपक्रमामध्ये जीपीएस प्रणालीद्वारे बसेसवर नियंत्रण ठेवले जाते. वाहनचालकांना वारंवार सूचना केल्या जातात तर रॅश ड्रायव्हिंग , बस टॉप चुकवणे अशा तक्रारही प्राप्त होतात. त्यासाठी पालिकेने तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक तसेच व्हॉट्सअप क्रमांक दिले आहेत. तर नियमावलींचा भंग करणाऱ्यांना वारंवार समज देऊन कारवाई केली जाते.

हेही वाचा…उरण : वाढत्या प्रवाशांना एनएमएमटी सेवेची अपेक्षा

सवलतींमुळे प्रवासी वाढले, पण उत्पन्न घटले

पालिका परिवहन उपक्रमाने १४ ऑक्टोबर २०२४ पासून महिलांना ५० टक्के तिकीट सवलत सुरू केली.त्यामुळे प्रवाशांची दैनंदिन संख्या १ लाख ८० हजारांवरून वाढून २ लाख २५ हजार झाली. पण पालिका परिवहन उपक्रमाचे दैनंदिन उत्पन्न ३६ लाखावरून ३० लाखांवर आले आहे.

उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम तोट्यात असून उत्पन्न वाढीसाठी परिवहन उपक्रमाने विविध पर्याय शोधले आहेत. एकीकडे उत्पन्न वाढीसाठी टास्क फोर्सची निर्मिती केली असताना दुसरीकडे परिवहन उपक्रमांच्या बस डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. वाशी सेक्टर ९ येथील बस डेपोच्या पुनर्विकासातून टोलेजंग व्यावसायिक इमारत उभी राहिली आहे. त्यातून परिवहन उपक्रमाला उत्पन्न वाढीची आशा आहे. वाशी बसडेपो प्रमाणेच कोपरखैरणे ,बेलापूर या बसडेपोंचा पुनर्विकास केला जाणार आहे. तसेच बसवरील जाहिरातीतून उत्पन्न वाढीचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : ट्रॅकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण गरजेचे

मागील काही वर्षांतील एनएमएमटीची अपघातस्थिती

वर्ष किरकोळ मोठे मृत्यू

२०१८-१९ ११६ ८ ४

२०१९-२० ११५ ६ ३

२०२०-२१ ७९ १० २

२०२१- २२ १४० २३ २

२०२२-२३ ५७ १५ ४

२०२३-२४ ५९ ७ ३

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai in last few years accident and death decreased sud 02