नवी मुंबई : नवी मुंबईलगत असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील हजारो कंपन्यांतून टनांवारी निघणारे भंगार खरेदी करणाऱ्यांची दादागिरी पूर्वीपासून सुरू आहे. आता ही प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहचत आहेत. आठवडाभरात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे भंगार खरेदी विक्री टोळ्यांची दहशत, त्यातून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औद्योगिक वसाहतीत साडेतीन चार हजाराच्या घरात लहान-मोठे कारखाने आहेत. त्यातील अनेक कारखान्यांतून ठरावीक दिवसांनी टाकाऊ माल अर्थात भंगार मोठ्या प्रमाणात निघते. भंगार खरेदी विक्रीची वर्षाला कोट्यवधींची उलाढाल होत असते. यात अनेक वर्षांपासून गुन्हेगारी प्रवृत्ती व्यक्तींनी प्रवेश केला आहे.

२४ फेब्रुवारीला ओरिएंटेल विविंड अँड प्रोसेसिंग कंपनीत भंगार खरेदी वरून राडा झाला होता. या कंपनीतील भंगार साहित्य एस. के. एंटरप्राइज नावाच्या भंगार खरेदी करणाऱ्या कंपनीला विकले. हे भंगार ट्रकमध्ये भरून बाहेर नेले जात असताना रुपेश आणि अनिल यांनी काही साथीदारांच्या मदतीने हे ट्रक रोखले. शेवटी एस. के. एंटरप्राइजचे कमाल खान यांच्याकडून साडे नऊ हजार रुपये जबरदस्तीने घेतल्यावर सर्व संशयित निघून गेले. या प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंद झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी असाच प्रकार घडला. महापे येथील भूखंड क्रमांक ३५२ येथे एक कंपनी असून व्यवसायाने माथाडी कामगार असलेले सूरज शेवाळे हे साथीदारांसह तेथे आले. त्यांनी भंगार सामान दुसऱ्याला का देतात असा जाब विचारला. याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.