नवी मुंबई : शहरातील सर्व प्राधिकरणांमध्ये परस्पर समन्वय रहावा व पावसाळी कालावधीत कोणतीही अडचण उद्भवल्यास त्याचे तत्परतेने निराकरण व्हावे यादृष्टीने महापालिका आयुक्त तथा शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी यापूर्वी सर्व प्राधिकरणांच्या संयुक्त बैठकीत सूचित केल्याप्रमाणे नवी मुंबई महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या पावसाळापूर्व कामांचा विभागनिहाय व सुविधानिहाय आढावा विशेष बैठकीत घेतला. त्यावेळी पावसाळापूर्व कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.

शहर अभियंता विभागामार्फत विविध कामे शहरात सुरु आहेत. यामध्ये शहरातील सुरु असलेले चौकांचे कॉंक्रीटीकरण, विविध विभागातील पदपथ, खोदकामे, डांबरीकरण, विविध ठिकाणचे नाले, गटारे, गावठाणातील रस्ते, इमारती, समाजमंदिरे अशा विविध प्रकारची कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी शहरात सुरू असलेल्या कामांची सद्यास्थिती शहर अभियंता तसेच आठही विभागांचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून विभागवार जाणून घेतली. यावेळी सुरू असलेली कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाळा कालावधी लवकर सुरू होणार असून पावसाचे दिवस कमी असतील मात्र तीव्रता अधिक असेल हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने तयारीत राहावे असे आयुक्तांनी सूचित केले.

हेही वाचा : वर्षभरात ९ हजार ३७३ वाहनांवर कारवाई, नवी मुंबई ‘आरटीओ’चे पाऊल

बेलापूर ते दिघा अशा आठही विभागात सुरु असलेल्या रस्ते, चौक आदी कामांची सदयस्थिती जाणून घेतानाच होल्डिंग पाँड व त्यावरील फ्लॅप गेट बसविण्याची कामेही तातडीने पूर्ण करुन घ्यावीत असे निर्देश दिले आहेत. शहरात गटारांची सफाई करताना गटारातून काढलेला गाळ अनेक दिवस तसाच पडून राहतो. त्यामुळे काढला जाणारा गाळ हा दोन ते तीन दिवसांतच उचलण्याची कार्यवाही काटेकोरपणे केली जावी असेही आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Story img Loader