नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून धावपट्टीबरोबरच विमानतळाची रडार यंत्रणा आणि इतर सुरक्षेच्या यंत्रणांच्या तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डिसेंबर महिन्यात हवाई दलाच्या सुखोई विमानाचे पहिल्यांदा उड्डाण होणार असल्याची आनंदवार्ता सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सिडकोच्या कर्मचाऱ्यांना दिली. सिडको कर्मचारी व अधिकाऱ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये झाला, त्यावेळी सिंघल बोलत होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ११६० हेक्टर जमिनीवर उभारले जात आहे. भूसंपादन व इतर तांत्रिक कारणांमुळे नवी मुंबईच्या विमानतळावरून प्रत्यक्ष उड्डाण होणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र गेल्या तीन वर्षांत या विमानतळाच्या बांधकामाला वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्यावर विविध चाचण्या सुरू आहेत.
मागील महिन्यात पावसाळ्यात विमानतळ धावपट्टीपासून काही अंतरावरून वैमानिकाला धावपट्टीची अचूक माहिती व्यवस्थित मिळते का याची चाचणी घेण्यात आली. यासाठी तीन दिवस धावपट्टीच्या काही अंतरावरून लहान विमानांची वेगवेगळी उड्डाणे उडविण्यात आली. विमानतळ प्रकल्पाची इतर कामे अंतिम टप्यात असून मार्च २०२५ ला या विमानतळाचा पहिला टप्पा मालवाहू वाहतुकीसाठी खुला केला जाईल असेही पुन्हा व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी कर्मचाऱ्यांसमोर घोषित केले. विमानतळावरून तीन महिन्यांत सुखोई या हवाई दलाच्या लढाऊ विमानाचे उड्डाण होणार असल्याच्या बातमीमुळे नवी मुंबईच्या बांधकाम व्यवसायाला चालना मिळणार आहे.