Navi Mumbai International Airport Inauguration Date: नवी मुंबई येथे तयार होत असलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ अवघ्या काही महिन्यांत प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. येत्या एप्रिल महिन्यात अर्थात १७ एप्रिलपासून या विमानतळावरून प्रवासी व मालवाहतुकीसाठीची उड्डाणे सुरू करण्याचा निर्धार व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. शिवाय नुकतंच या विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वीरीत्या लँडिंग करण्यात आलं. त्यामुळे नवी मुंबईकरांसाठी हे विमानतळ उत्सुकतेचा विषय असलं, तरी पुणेकरांसाठी मात्र हे विमानतळ प्राधान्याचा विषय असेल! याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पुण्यापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कमी असणारं अंतर!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंतर कमी, वेळेची बचत!

या अंतरामुळेच मुंबईकरांप्रमाणेच पुणेकरांमध्येही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत उत्सुकता आहे. या विमानतळामुळे पुणेकरांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार आहे. गुगल मॅपवरच बोलायचं झालं तर पुण्यापासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं अंतर ट्रॅफिक नसताना साधारण ३ तास ३० मिनिटं इतकं आहे. पण तेच अंतर नवी मुंबई विमानतळापर्यंत फक्त २ तास २० मिनिटं इतकं आहे. त्यामुळे पुणेकरांच्या वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. एक्स्प्रेस वेवरून निघालं की थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे.

लोहगाव विमानतळाच्या मर्यादा

वास्तविक पुणेकरांसाठी लोहगाव विमानतळ हे सर्वात नजीकचं आहे. पण तिथून फक्त दुबई, सिंगापूर आणि बँकॉक या तीन ठिकाणीच आंतरराष्ट्रीय विमानं जातात. यासंदर्भात हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वांदेकर इंडियन एक्स्प्रेसला म्हणाले, “पुण्यातल्या लोहगाव विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मर्यादा आहेत. तिथल्या धावपट्ट्या कमी आहेत. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेत तिथून विमान उड्डाणं होत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांसाठी प्रवाशांना हैदराबाद, बंगळुरू किंवा दिल्लीला जावं लागतं. बाणेरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला तर जेवढा वेळ लोहगाव विमानतळावर जायला लागेल, तेवढाच किंवा त्यापेक्षा किंचित जास्त वेळात ती व्यक्ती थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचेल”.

उद्योगविश्वाला फायदा

दरम्यान, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो विमानांसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उद्योग-व्यावसायिकांसाठीही वेगळे पर्याय शोधणं आवश्यक ठरतं. पण नवी मुंबई विमानतळामुळे ही अडचण दूर होऊ शकते. नाशिवंत मालाची आयात-निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नवी मुंबई विमानतळ हा चांगला पर्याय ठरू शकतो. पुण्याजवळच्या चाकण व तळेगावमधील उद्योगांसाठी नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्याचा कमी वेळ महत्त्वाचा ठरू शकतो.

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई विमानतळावर ‘या’ तारखेपासून विमान उड्डाणं होणार सुरू; मुहूर्त ठरला!

नवी मुंबई विमानतळाकडे मोठ्या विमान कंपन्यांची पाठ?

दरम्यान, याआधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला मोठ्या विमान कंपन्यांना आपली विमान उड्डाण सुविधा या विमानतळावरून करण्यास राजी करण्यात अडचणी आल्या होत्या. विशेषत: एअर इंडिया व इंडिगो एअरलाईन्सला प्राईम स्लॉट देऊनही त्यांनी इथून सेवा सुरू करण्यात अनुत्सुकता दर्शवली होती. पण परिस्थिती लवकरच बदलेल, असा विश्वास वांदेकर यांना वाटतो. “मला वाटतं विमान कंपन्या नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू करतील. याआधी फक्त विमान कंपन्यांना स्पर्धात्मक राहावं लागत होतं. आता विमानतळांनाही स्पर्धात्मक राहावं लागेल. जर नवी मुंबई विमानतळानं इतर विमानतळांपेक्षा कमी दर आकारले, तर विमानकंपन्यांना त्यांच्या सुविधा नवी मुंबईकडे वळवाव्याच लागतील”, असं वांदेकर म्हणाले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai international airport nearest from pune city convineint to travel pmw