नवी मुंबई : एकेकाळी रासायनिक हब अशी ओळख असलेल्या नवी मुंबई शहरातील औद्योगिक पट्ट्यांमध्ये गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञानासंबंधी कंपन्यांची पायाभरणी झालेली असून त्यापाठोपाठ आता झवेरी बाजार तसेच सेमीकंडक्टर यासारखे प्रकल्प शहरात उभे राहत आहेत. यातील सेमीकंडक्टर प्रकल्पाची मुहूर्तमेढ बुधवारी रोवली गेली आहे. यानिमित्ताने नवी मुंबई शहरातील औद्योगिक पट्टे आता डाटा सेंटर, झवेरी आणि सेमीकंडक्टरचे हब बनू पाहत असल्याचे चित्र आहे.
ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई शहर हे नियोजित शहर म्हणून ओळखले जाते. या शहरातील महापे-बेलापूर या औद्योगिक पट्ट्यात मोठ्या कंपन्या आहेत. याशिवाय, उरण आणि तळोजा पट्ट्यातही मोठे उद्याोग उभे राहिलेले आहेत. नवी मुंबईतील महापे-बेलापूर या औद्योगिक पट्ट्यात रासायनिक कंपन्यांची संख्या मोठी आहे. यामुळे रासायनिक कंपन्यांचे शहर म्हणूनही नवी मुंबईची ओळख होती. परंतु गेल्या काही वर्षांत काळानुरूप नवी मुंबईची ओळख बदलताना दिसून येत आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. या शहरात गेल्या काही वर्षांत माहिती तंत्रज्ञानासंबंधी कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. रायगड आणि नवी मुंबईत डेटा सेंटरच्या माध्यमातून नवीन सोन्याची खाण निर्माण होणार असून यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत, अशी औद्योगिक क्षेत्रात चर्चा आहे. असे असतानाच ज्वेलरी तसेच सेमीकंडक्टर यासारखे प्रकल्प शहरात उभे राहत आहेत.
आणखी वाचा- ‘सचिन तेंडुलकर ‘पिच’वरून ‘चीप’वर आले’, एकनाथ शिंदेंची टोलेबाजी
मुंबईतील झवेरी बाजार गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याची टीका विरोधकांनी राज्य सरकारवर केली होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्या वेळी राज्याचे उद्याोगमंत्री उदय सामंत यांनी देशातील सर्वात मोठ्या झवेरी बाजाराची उभारणी नवी मुंबईत करण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार हा उद्याोगही नवी मुंबईत उभा राहत आहे. हार्डवेअर क्षेत्रातही आता आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून देशाने पहिले पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजेच या प्रकल्पाची उभारणी राज्यातील नवी मुंबई शहरात होत असून सेमीकंडक्टर प्रकल्पाची मुहूर्तमेढ बुधवारी रोवली गेली आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या उद्याोग क्षेत्राला गती देण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रातील नवी क्रांती असल्याचे म्हटले.
आणखी वाचा- राज्यात आमचेच सरकार असणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अर्थव्यवस्थेच्या पाच ट्रिलियन डॉलरच्या उद्दिष्टापैकी एक ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट राज्याने आखले असून सेमीकंडक्टर प्रकल्पासारख्या उद्याोगांमुळे ते पूर्ण होऊ शकेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या सेमीकंडक्टर प्रकल्प कार्यक्रमात सांगितले. भारताला जगामध्ये विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचे असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग व्हायचे असेल तर सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावेच लागेल. त्याचीच पायाभरणी नवी मुंबई शहरातून होत आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.