नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचा वेग लवकरच वाढणार असून मेट्रोतील प्रवाशांना गारेगार सुस्साट प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. सध्या नवी मुंबई मेट्रोचा वेग सरासरी ताशी २५ प्रति किलोमीटर आहे. नुकतेच नवी दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा विभागाने (कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी -सीएमआरएस ) नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेणधर या पहिल्या मार्गिकेवरील वेगाची चाचणी केली. ही चाचणी यशस्वी झाल्याचे अद्याप प्रमाणपत्र महामेट्रोला मिळाले नसले तरी सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ही चाचणी यशस्वी झाली असून लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी ६० प्रति किलोमीटरने सुस्साट धावणार आहे. यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना जलदगतीने अंतर कापता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडको महामंडळाने बांधलेल्या नवी मुंबई मेट्रोचे संचलन सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कंपनीमार्फत सुरू आहे. आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी या मेट्रोसेवेचा लाभ घेतला आहे. सिडकोला तिकीट दरातून १४ कोटी ५० लाख रुपये महसूली उत्पन्न मिळाले आहे. बेलापूर ते पेणधर या ११.१ किलोमीटरच्या अंतरावर ११ विविध मेट्रो स्थानके आहेत. २० जानेवारीपासून सिडकोने मेट्रो मार्गावर सर्वाधिक गर्दीच्या वेळांमध्ये दर दहा मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू केली आहे. गर्दीच्या वेळेत बेलापूर येथून सकाळी साडेसात ते १० वाजता आणि सायंकाळी साडेपाच ते आठ वाजेपर्यंत तर पेणधर येथून सकाळी सात ते साडेनऊ आणि सायंकाळी पाच ते साडेसात दरम्यान दर दहा मिनिटांनी मेट्रोची फेरी झाली आहे. गर्दीच्या वेळा वगळता उर्वरित वेळांमध्ये बेलापूर व पेणधर येथून दर १५ मिनिटांनी मेट्रो धावत आहे.

नवी मुंबई मेट्रोला नुकतेच आयएसओ ९००१ – २०१५ हे मानांकन मिळाले आहे. गुणवत्ता व्यवस्थापन, व्यावसायिक स्वास्थ्य तथा सुरक्षा व्यवस्थापन आणि पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली ही तीनही आयएसओ मानांकने प्राप्त करणारी राज्यातील एकमेव मेट्रो सेवा आहे. जानेवारी महिन्यात नवी मुंबई मेट्रोच्या गतीची चाचणी घेण्यात आली असून अद्याप चाचणीचे प्रमाणपत्र सिडकोला मिळाले नाही. परंतु मेट्रोला प्रतिताशी ८० किलोमीटरच्या वेगाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सरळ मेट्रोच्या मार्गिकेवर जास्तीत जास्त प्रतिताशी ७० किलोमीटरच्या वेगाने मेट्रो धावू शकेल. मात्र मेट्रोच्या वळण मार्गावर मेट्रोची गती कमी राहील. मेट्रोच्या वेगचाचणीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर स्वयंचलित धावणारी संचलनाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रोची गती वाढविली जाणार आहे. पुढील दीड महिन्यात वेग चाचणीचे प्रमाणपत्र मिळाण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर नवी मुंबई मेट्रोतून प्रवाशांना अवघ्या पंधरा मिनिटांत बेलापूर ते पेणधर या मार्गिकेवर प्रवास करता येईल. सिडकोच्या जनसंपर्क विभागाच्या प्रमुख प्रिया रातांबे यांना याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन प्रतिक्रिया देते असे सांगितले.

  • बेलापूर ते पेणधर या ११.१ किलोमीटरच्या अंतरावर ११ स्थानके
  • आतापर्यंत ६० लाख प्रवाशांनी घेतला मेट्रोसेेवेचा लाभ
  • सिडकोला तिकीट दरातून १४ कोटी ५० लाख रुपये महसूली उत्पन्न
  • २० जानेवारीपासून सर्वाधिक गर्दीच्या वेळांमध्ये दर दहा मिनिटांनी मेट्रोची फेरी
  • उर्वरित वेळांमध्ये बेलापूर व पेणधर येथून दर १५ मिनिटांनी मेट्रो