जानेवारी २०१७ मध्ये नवी मुंबईतील बेलापूर ते पेणधर या उन्नत मार्गावरून जाणारी नवी मुंबई मेट्रो आता रखडली असून या मेट्रोचा प्रवास प्रस्तावित विमानतळाच्या पहिल्या टेक ऑफबरोबरच होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. बेलापूर, पेणधर, कळंबोली, खांदेश्वर या ११ किलोमीटर मार्गाच्या मेट्रोचे काम संथगतीने सुरू असून नवीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी मंगळवारी या प्रकल्पाला भेट दिली. मे २०११ मध्ये दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या कामाला सुरुवात झाली. ते आता पुढील दोन वर्षे पूर्ण होणार नाही, असे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्चही वाढणार आहे.
मुंबई मेट्रोनंतर नवी मुंबईत मेट्रो प्रवास सुरळीत व्हावा यासाठी माजी व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांनी ‘रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम’द्वारे नवी मुंबई मेट्रोची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यानंतर आलेले संजय भाटिया यांनी या प्रकल्पाला म्हणावे तसे महत्त्व दिले नाही. त्यामुळे या प्रकल्पाला वेग येऊ शकला नाही. खारघर ते पनवेल या भागांतील रहिवाशांना मोठा दिलासा ठरणारा हा प्रकल्प आहे. मे २०११ मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ झाला होता. त्या वेळी ही सेवा जानेवारी २०१७ पर्यंत सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे जाहीर केलेल्या कालावधीनुसार आता सात महिने हा प्रकल्प सुरू करण्यास शिल्लक राहिले आहेत, मात्र या प्रकल्पाचे सिमेंट खांब बांधण्याचे काम अर्धवट आहे. सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी येथे एक मोठी तुलई टाकण्याचे काम गेली कित्येक दिवस अपुरे आहे. त्याचप्रमाणे तळोजा येथे उड्डाणपूल बांधण्याच्या कामालाही रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदील न मिळाल्याने हा प्रकल्प चांगलाच रखडला आहे. सिमेंटचे खांब आणि तुलई टाकण्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, स्टेशन या कामांना गती येणारी नाही. त्यामुळे जानेवारी २०१७ पर्यंत या प्रकल्पाचे ५० टक्केकामदेखील पूर्ण होणारे नाही. सद्य:स्थितीतील कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे डिसेंबर २०१९ मध्ये प्रस्तावित विमानतळाच्या पहिल्या टेक ऑफचे स्वप्न सिडकोने दाखविले असून त्याच वेळी मेट्रोची धाव पूर्ण होणार आहे असे दिसून येते आहे. मेट्रो जाहीर झाल्याने या भागातील घरांचे भाव गगनाला भिडले आहेत.

Story img Loader