नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील औद्योगिक पट्ट्यालगत असलेल्या विभागांना अजूनही प्रदूषित वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने उसंत घेताच शहरात पुन्हा रात्रीच्या वेळी दूषित हवा सोडली जात आहे. काल रात्री दीडच्या सुमारास वाशी आणि कोपरखैरणे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुरके पसरले होते. या धुक्यामुळे सर्वत्र उग्र वासही येत होता. ऐन झोपेच्या वेळी धुरके आणि येणाऱ्या दर्पाने नागरिक हैराण झाले होते.
नवी मुंबईत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाई करून देखील नागरिकांना मोकळा श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. सध्या पावसाने उसंत घेतली आहे, त्याचा फायदा घेत आता पुन्हा हवेत रासायनिक मिश्रित धूर सोडला जात आहे. वाशी आणि कोपरखैरणे भागात रात्रीनंतर छुप्या पध्दतीने रासायनिक मिश्रितदूषित धूर हवेत सोडला जात असून रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोपरखैरणे, वाशी विभागात रात्री दीडच्या सुमारास अचानक हवेत जास्त प्रमाणात धूलिकण दिसत होते. त्याच बरोबर हवेचा उग्र वासही येत होता. त्यामुळे श्वास घेताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. अचानक हवेत असे धूलिकण किंवा धुराची स्थिती कशी निर्माण झाली? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
हेही वाचा : वीज ग्राहकांचा ऑनलाईन बिल भरण्याचा वाढता कल, जुलै महिन्यात ५६३ कोटी रुपयांची देयके ऑनलाईन
जानेवारी २०२३मध्ये नवी मुंबई शहराने हवा गुणवत्तेत दिल्लीला मागे टाकत उच्चांक पातळी गाठले होती. शहराच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाने उच्चांक पातळी ३९३ एक्युआय गाठली होती. आज गुरुवारी नेरूळ आणि सानपाडा येथील हवा मध्यम प्रकारात मोडत असल्याच्या नोंदी आहेत. मात्र सध्या नवी मुंबई शहरातील महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे ऐरोली आणि महापे येथील हवा गुणवत्ता निर्देशांक उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या विभागात हवा प्रदूषण झाल्याचे निदर्शनास येणार कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
हेही वाचा : उरण पनवेल रस्त्यावर मोकाट गुरांचा अघोषित रास्ता रोको, गुरे आणि प्रवाशांना अपघाताचा धोका
‘हवा प्रदूषणाबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यास आमचा विभाग पाहणी करतो. तसेच सातत्याने प्रदूषण करण्याऱ्या औद्योगिक कंपन्याना नोटीस ही पाठविण्यात येतात’, असे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम (नवी मुंबई) यांनी म्हटले आहे.