नवी मुंबई : गेल्या वर्षी नवी मुंबई महापालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा कोणतीही करवाढ नसलेला शिलकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला होता. आता यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष असून यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तो लवकर सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने महापालिकेनेही अर्थसंकल्पाबाबत विभागवार माहिती जमविण्याची तयारी सुरू केली आहे.
२२ जानेवारीला अयोध्या येथील राम मंदिराचा सोहळा झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गतवर्षी पालिकेचा अर्थसंकल्प १७ फेब्रुवारीला जाहीर झाला होता. नियमानुसार यावर्षी २२ फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्प मांडण्याची मुदत आहे. परंतु आचारसंहितेचा विचार करता पालिकेनेही अर्थसंकल्पाची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.
नव्या व जुन्या प्रकल्पांची सांगड घालत जास्तीत जास्त मागील वर्षात सुरू असलेले व अर्धवट प्रकल्पच पूर्ण करण्यावर भर देणारा व वाहतूक सुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे विविध प्रकल्प पूर्ण करण्याकडे पालिकेचे लक्ष असणार आहे. त्यामध्ये घणसोली पामबीच मार्ग या कामाच्या निविदेबाबतही लगबग सुरू असून विविध वाहतूक सुविधांच्या मार्गासह अर्थसंकल्पात समाजविकास सेवा माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर पालिकेचा भर असणार आहे. शहरात तरी जुन्या पुस्तकाला नवीन वेष्टन लावून नवी झळाळी देणारा अर्थसंकल्प असणार का याची उत्सुकता असणार आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात बस स्थानक विकास, नाले ही कामे तसेच सायन्स पार्क विकास, शहरातील मैदानांचा विकास, नाट्यगृह, तरण तलाव, दवाखाने, शाळा, मोरबे धरणावरील तरंगता सोलार प्रकल्प यासह सीसीटीव्ही काम पूर्ण करणे व आरोग्य सुविधा अधिक प्रभावी करण्याकडे पालिकेचा कल असण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रभाव या अर्थंसंकल्पावर असणार असून कोणत्याही प्रकारची करवाढ कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारी नाही. त्यामुळे यावर्षीही नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा करवाढ नसलेलाच असण्याची शक्यता अधिक आहे.
आगामी लोकसभा निवडणुका व त्यासाठीची आचारसंहिता याबाबतचा विचार करून आचारसंहितेआधीच अर्थसंकल्प मांडण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारीला सुरुवातही केली आहे. गेल्या वर्षी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी अर्थसंकल्पीय अंदाज जाहीर करण्यात आला होता. आता विविध विभागांकडून अर्थसंकल्पाबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. – सत्यवान उबाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी.