नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सहाय्यक आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत.
सहाय्यक आयुक्त संजय तायडे यांची समाज विकास विभागातून घणसोली विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे बदली करण्यात आली आहे. तर शशिकांत तांडेल यांची मालमत्ता विभागतून सहाय्यक आयुक्त बेलापूर विभाग कार्यालय, तसेच घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त शंकर खाडे यांची बदली सहाय्यक आयुक्त दिघा विभाग येथे करण्यात आली आहे. तर चंद्रकांत तायडे यांची बदली भांडार विभागतून परवाना विभागात करण्यात आली आहे. बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त मिताली संचेती यांची बदली बेलापूर विभाग सहाय्यक आयुक्तपदावरून भांडार व मालमत्ता विभागात करण्यात आली आहे.
मनोहर गांगुर्डे यांची बदली दिघा विभाग कार्यालयातून नेरूळ विभाग कार्यालय सहाय्यक आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. प्रशासकीय अधिकारी सुनिल पाटील यांची नेरूळ विभाग कार्यालय त कोपरखैरणे विभाग कार्यालय येथे बदली करण्यात आली आहे. तुर्भे विभागाचे उपअभियंता प्रशांत पिंपळे यांची घणसोली विभागात, तर घणसोली विभागाचे उपअभियंता विश्वकांत लोकरे यांची तुर्भे विभागात बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होणे बंधनकारक आहे. सदर कर्मचाऱ्यांनी अनधिकृत रजेवर जाऊ नये, अन्यथा त्यांची अनुपस्थिती अनधिकृत गैरहजेरी समजण्यात येवून विनावेतन व विनाभत्ते करण्यात येईल. तसेच त्यांच्यावर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी या आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा – यंदा ज्वारीचे उत्पादन कमी, आगामी काळात दरवाढ होणार? यावर्षी उत्पादनात ३० ते ४० टक्के घट
बदल्यांचे गौडबंगाल…
नवी मुंबई महापालिकेत अनेकवेळा मोठ्या प्रमाणात पालिका क्षेत्रात अंतर्गत बदल्या केल्या जातात त्याचप्रमाणे नुकत्याच पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कामकाजाच्या सोयीसाठी अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, परंतु बदल्यांचा आदेश निघाल्यानंतरही अनेक अधिकारी आपल्या मूळ विभागातच ठाण मांडून बसतात, असा इतिहास आहे. परंतु पालिका आयुक्त नार्वेकर यांनी बदल्यांबाबत कडक भूमिका घेतली असून बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.