नवी मुंबई – मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात असून, आरोग्य सेवेचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली या सार्वजनिक रुग्णालयांची महत्वाची भूमिका असून सर्वसामान्य माणसांसाठी हा आरोग्य दिलासा आहे. त्यातही राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोली येथील अद्ययावत असा नवजात शिशू विभाग हा नवजात बालकांसाठी वरदानच ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐरोली परिसरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकसंख्येचे प्रमाण जास्त असून त्यामुळे या ठिकाणी अतिजोखमीची प्रकृती असणाऱ्या मातांचे प्रसुतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी नवजात शिशू विभाग सुरू होणे ही अत्यावश्यक गरज होती. त्यास अनुसरून ३ सप्टेंबर २०२९ रोजी १२ खाटांच्या व्यवस्थेचा नवजात शिशू विभाग ऐरोलीतील राजमाता जिजाऊ रुग्णालयात सुरू झाला होता. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड यांच्यासह बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल देशमुख व डॉ. सचिन बिरादार यांनी नवजात शिशू विभाग कसा असावा याचे सूक्ष्म नियोजन केले. ऐरोली विभागात आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाण अधिक असून ऐरोलीतील रुग्णालयांचा चांगला उपयोग होत आहे. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा राठोड आणि परिसेवक प्रकाश बारवे यांनी परिचारिकांचा विशेष समूह निवडला. त्या समुहाला केईएम व ज्युपिटरसारख्या मानांकित रुग्णालयांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. गरोदर मातांना प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात गुणात्मक उत्तम सेवा देणे हे ध्येय नजरेसमोर ठेवून कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मागील ३ वर्षे ३ महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच ३ सप्टेंबर २०१९ पासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या ठिकाणी १०५३ प्रसुती झाल्या असून, या ठिकाणी सर्वात कमी वजनाचे व कमी दिवसांचे प्रिमॅच्युअर बाळ हे २६ आठवड्यांमध्ये जन्मलेले ७५० ग्रॅम वजन असलेले होते.

हेही वाचा – एकच मागणी, हवे हक्काचे पाणी; १ मार्चला करंजा ग्रामस्थ पाण्यासाठी करणार एल्गार

हे बाळ एनआयसीयूमध्ये ७३ दिवस होते. त्यावर सुयोग्य उपचार केल्यामुळे या बाळाची सर्व वाढ व विकास योग्यरितीने झाली असून, हे बाळ आज ३ वर्षांचे झाले आहे. विशेष म्हणजे, या रुग्णालयात तिळेही जन्माला आले असून, ही तिळी ३१ आठवड्यांमध्ये जन्मली होती. त्यांचे वजन अनुक्रमे १.४ कि.ग्रॅ., १ कि.ग्रॅ. व १.३ कि.ग्रॅ. होते. यापैकी २ नंबरच्या बाळाला पिन्युमोथोरॅक्स हा गंभीर आजार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यावरही नवजात शिशू विभागाच्या वैद्यकीय समुहाने शल्य चिकित्सक डॉ. सागर होटकर यांच्या मार्गदर्शनानुसार योग्यरित्या उपचार केला व ही तिन्ही बाळे ४९ दिवस एनआयसीयूमध्ये उपचार घेऊन सुखरूप घरी गेली. सर्वसाधारपणे बाळाचे वजन ३.५ कि.ग्रॅ. पेक्षा जास्त नसते. यापेक्षा जास्त वजन असलेल्या बाळामध्ये आरोग्य विषयक गुंतागुंत निर्माण होऊन प्रसंगी बाळ दगावू शकते.

या रुग्णालयात आत्तापर्यंतच्या कालावधीत सर्वात जास्त ४.५५ कि.ग्रॅ. वजनाचे बाळ जन्मले होते. या बाळालाही श्वास घेण्यासाठी तीव्र त्रास होत होता. तसेच पल्मनरी हायपरटेन्शन नामक आजार असल्याचे निदर्शनास येत होते. या बाळावर अत्याधुनिक पद्धतीने काळजीपूर्वक उपचार करण्यात आले व हे बाळही सुखरूप घरी गेले. या ठिकाणाहून गंभीर आजार असलेली अनेक बालकेही व्यवस्थित उपचार घेऊन घरी गेली आहेत. रुग्णालयाच्या एनआयसीयू विभागात मागील ३ वर्षांत १०५३ नवजात शिशूंपैकी केवळ ५१ अतिगंभीर परिस्थितीतील नवजात शिशू दगावले असून या विभागातील मृत्यू दर ४.८४ टक्के इतका कमी आहे. अतिउत्कृष्ट एनआयसीयू मानल्या जाणाऱ्या एनआयसीयूचा मृत्यूदरही यापेक्षा अधिक असतो. नवजात शिशू विभागातील मृत्यूदर ५ टक्केपेक्षा कमी असणे ही कामगिरी प्रशंसनीय मानली जाते. या सर्व यशोगाथा प्रातिनिधिक स्वरुपातील असून, अशी बरीच उल्लेखनीय कामे ऐरोली रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागामार्फत करण्यात आलेली आहेत.

सद्यस्थितीत खाजगी एनआयसीयूमध्ये दिवसाला २५ ते ५० हजार रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च येतो. अशा परिस्थितीमध्ये गोरगरीब गरजू रुग्णांकरिता हा विभाग एक प्रकारे वरदानच आहे. या विभागाच्या उभारणीकरिता तसेच विकासाकरिता तत्कालीन मागील ३ आयुक्त तसेच विद्यमान आयुक्त राजेश नार्वेकर यांचेही सहकार्य होत असून, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व वैद्यकिय आरोग्य अधिकारी प्रमोद पाटील, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड यांनीही विभागाच्या क्षमता वृद्धीसाठी मोलाचे सहकार्य केले आहे. नवजात शिशू विभागाच्या विस्ताराची गरज लक्षात घेऊन येथे बेड्सची संख्या १२ वरून १७ करण्यात आली आहे. तसेच अद्ययावत उपकरणांची सुविधा आहे. विशेष बाब म्हणजे, या ठिकाणी नवजात शिशूंवर म्युझिक थेरपीव्दारे उपचार केले जात आहेत. डॉ. अमोल देशमुख हे एनआयसीयू विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत असून त्यांच्यासोबत डॉ. पंडीत जाधव, व अनेक डॉक्टर्स आपली सेवा बजावीत आहे. ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय ऐरोलीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा राठोड यांनी पालिकेच्या या रुग्णालयात चांगली सुविधा देत असल्याचे सांगीतले.

हेही वाचा – नवी मुंबई : बाजारात रसाळ फळांची मागणी वाढली, ग्राहकांची कलिंगड, द्राक्षाला अधिक पसंती

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पालिकेच्या ऐरोली, नेरूळ, वाशी रुग्णालयात सर्वसामान्यांसाठी चांगली सुविधा दिली जात असून, ऐरोली येथील रुग्णालय परिसरात आर्थिक दुर्बल घटकातील गरोदर महिलांची संख्या मोठी असून, त्यांना व बालकांना अतिशय चांगली सुविधा पालिकेकडून दिली जात आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai mnc rajmata jijau hospital in airoli is proving to be a boon for baby and mothers ssb
Show comments