नवी मुंबई: नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरातही यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शहरावर पाणी कपातीचे संकट ओढवले आहे. यंदाच्या पावसाळ्यात मोरबे धरण परिसरात ९ जूनला पावसाला सुरुवात झाली. आतापर्यंत मोरबे धरणात एकूण ७७४.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . यंदाच्या पावसाळ्यात पावसाने ओढ दिल्यामुळे नवी मुंबईकरांचे डोळे पावसाकडे लागलेले आहेत. धरण परिसरात थोड्याफार प्रमाणात पाऊस पडत असला तरी अजूनही पावसाचा जोर कमीच आहे. परंतु मागील २४ तासांत रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत एका दिवसात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी २० जूनला ११७.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
यंदाच्या पावसाळ्यात ७७४.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात पाणीसाठा कमी आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी धरणात ३२.६०% पाणीसाठा होता तर आज धरणात ३१.०८ % पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येत आहे तर नागरिकांना जोरदार पावसाकडे डोळे लागले आहेत.