नवी मुंबई : कंत्राटी कामगारांनी बेकायदेशीर काम बंद आंदोलन करू नये असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केल्यानंतरही सोमवारी केलेल्या आंदोलनामुळे शहरात दिवसभर कचरा कोंडी पाहायला मिळाली होती. परंतु पालिका प्रशासन व घनकचरा विभागातील कर्मचारी अधिकारी तसेच साफसफाई कर्मचारी यांनी रात्रभर अथक प्रयत्नातून साफसफाई करत मंगळवारी दुपारपर्यंत जवळजवळ ७०६ टनांहून अधिक कचरा उचलून डंपिंग ग्राऊंडवर पोहचवला. दरम्यान, बुधवारी योग्य न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटी कामगार संघटनांनी दिला आहे. त्यामुळे बुधवारी कंत्राटी कामगारांबाबत बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई शहरात समाज समता कामगार संघाशी संबंधित कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच स्वच्छतेच्या कामाला सुरवात न करता आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यामुळे कचरा वाहतूकीत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे शहरात बेलापूर ते दिघा या सर्वच परिसरात विविध ठिकाणी रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग पाहायला मिळाले. कामगारांनी संप तात्पुरता मागे घेतल्यानंतर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त व घनकचरा विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे व डॉ. अजय गडदे यांच्या प्रयत्नांतून रात्रभर कचरा उचल्याने काम करण्यात आले त्यामुळे मंगळवारी सकाळी विविध भागात स्वच्छतेबाबतची पूर्ववत स्थिती पाहायला मिळाली.
पालिकेने स्वच्छतेबाबत खबरदारी घेतली होती. आंदोलन मागे घेतल्यानंतर कंत्राटी कामगार व इतर कामगारांच्या मदतीने काही तासात ७०६ टन कचरा उचलून डंपिंग ग्राऊंडवर नेण्यात आला होता. – संतोष वारुळे ,उपायुक्त घनकचरा विभाग परिमंडळ २