नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर पाच येथे एका इमारतीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून ९ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पोलीस आणि मनपा प्रशासनाला या इमारतीच्या विकासकाचे नावही माहिती नसल्याचे उघड झाले आहे. हे बांधकाम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकित ठनूगा , वय वर्ष ९ असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. सेक्टर ५ मध्ये हे इमारत बांधकाम सुरू होते. या ठिकाणी खणलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी घटना घडली त्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीत तो राहत होता. घरात एकुलता एक असल्याने या घटनेने केवळ कुटुंबीयच नव्हे तर परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत. मुलाचा मृत्यू ही घटना बुधवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास उघडकीस आली.

हेही वाचा >>> एनएमएमटीचे ‘चालते फिरते’ ग्रंथालय गायब; परिवहन विभागाच्या चांगल्या उपक्रमाला अनास्थेचे कोंदण

इमारत बांधकाम वेळी चारही दिशेला पत्रे बांधणे सुरक्षा रक्षक ठेवणे विहित वेळेत काम पूर्ण करणे या तिन्ही नियमांना हडताळ फासले असल्याची स्थिती आहे. केवळ दर्शनी भागात पत्रे लावण्यात आले आहेत तर मागच्या बाजूला केवळ लाकडी पट्ट्या रोवल्या आहेत. तेथूनच कदाचित हा मुलगा आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे बांधकाम   क्षेत्र आणि मनपा शाळा क्रमांक ३५ यांच्यात केवळ लोखंडी संरक्षक कठडा आहे. त्यालाच चिकटून खोदलेल्या खड्ड्यात अंकित याचा बुडून मृत्यू झाला आहे.

या घटने प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात केनी नावाच्या व्यक्ती विरोधात निष्काळजी पणा केल्याने एकाच्या मृत्यूस कारण कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या मृत्यूला कारण नेमके कोण आहे त्या व्यक्तीच्या पूर्ण नावाचा तपास करून त्या व्यक्तीवर कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा >>> विमानतळाची धावपट्टी सज्ज; नवी मुंबई विमानतळावर प्राधिकरणाकडून आणखी एक यशस्वी चाचणी

वाचविण्याचा प्रयत्न निष्फळ

ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्याच्या दोन बाजूला इमारती एका बाजूला मनपा शाळा क्रमांक ३५ तर एका बाजूला रस्ता आहे. मुलगा बुडत असतानाच जवळच्या एका इमारतीत राहणाऱ्या महिलेचे लक्ष गेले. तिने आरडाओरडा केला. त्यावेळी लोक जमा झाले मात्र तोपर्यंत तो बुडाला होता. नजिकच्या हॉटेल मधील एका कामगाराने धाडस करून त्याला बाहेर काढले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिली.

घटनेबाबत सविस्तर माहिती घेऊन अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा अहवाल वरिष्ठांना सादर करून त्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल.– डॉ, कैलास गायकवाड, उपायुक्त परिमंडळ २

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal administration unaware of construction developer of building in koparkhairane zws