लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई : दक्षिण अफ्रिकेतील ८६.६ किलोमीटर अंतराच्या जागतिक स्तरावरील मानाच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सहभागी होत निर्धारित वेळेच्या आधीच ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदात अंतर पूर्ण करून नवी मुंबई शहराचा नावलौकिक जगभरात उंचावला आहे.

कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील एक नामांकित स्पर्धा असून तब्बल ८६.६ किलोमीटरची ही स्पर्धा पूर्ण करताना खेळाडूंचा कस लागतो. स्पर्धेत सहभागी होऊन वेळेत स्पर्धा पूर्ण करणे हे प्रत्येक मॅरेथॉन धावणाऱ्या खेळाडूचे स्वप्न असते. त्याकरिता खेळाडू कठोर मेहनत घेत असतात. यावर्षी ९जून रोजी ही ९७ वी मॅरेथॉन डर्बन येथून सुरू होऊन पीटरमार्टिझबर्ग शहरात संपन्न झाली.

आणखी वाचा-पनवेलकरांनो आरोग्याची काळजी घ्या- महापालिका आयुक्त चितळे  

यावर्षीची मॅरेथॉन अपरन अर्थात चढणीची होती. एक वर्ष डाऊन रन आणि एक वर्ष अपरन अशी कॉम्रेड मॅरेथॉन असते. यावर्षी ५९२३ फूट उंचीचे ८६.६ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ७४ हून अधिक देशातील २२ हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये ३६६ भारतीय स्पर्धकांचा समावेश होता. समुद्रसपाटीपासून १८०० मीटर उंचीवर असलेल्या हे अंतर पार करताना २० ते २५ टेकड्या चढाव्या लागतात. ही स्पर्धा १२ तासांच्या आत पूर्ण करावी लागते. डॉ. कैलास शिंदे यांनी ११ तास १० मिनिटे ५६ सेकंदात हे अंतर पार करून आपली शारीरिक क्षमता सिध्द केलेली आहे.

त्यासाठी मागील सहा महिन्यांपासून डॉ. कैलास शिंदे कसून सराव करत होते. प्रामुख्याने सुट्टीच्या दिवशी त्यांनी रात्री व पहाटे सराव करून मॅरेथॉनच्या अंतराचे व वेळेचे व्यवस्थित नियोजन केले. आफ्रिकेसारख्या देशात धावायचे असल्याने तेथील भौगोलिक परिस्थितीचाही विचार करून त्यांनी तशा प्रकारे सरावावर भर दिला. महत्त्वाचे म्हणजे आपल्या सरावाचा कोणताही परिणाम त्यांनी दैनंदिन कामकाजावर होऊ दिला नाही. नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज त्यांनी आयुक्त म्हणून संपूर्ण क्षमतेने पाहिलेच शिवाय लोकसभा निवडणुकीची निरीक्षक म्हणून बिहारमध्ये जबाबदारी पार पाडत असतानासुद्धा धावण्याच्या सरावात खंड पडू दिला नाही. जगातील अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर समजल्या जाणा-या या जागतिक मॅरेथॉ़नमध्ये सहभागी होणारे ते एकमेव सनदी अधिकारी आहेत.

आणखी वाचा-कळंबोली येथील लोखंड बाजार समितीचे ५४ कोटी रुपये लंपास

सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवले असून गतवर्षीपेक्षा कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करीत त्यांनी आपली कामगिरी आणखी उंचावली आहे. आधी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक व त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी आणि अत्यंत व्यस्त दिनक्रमातही त्यांनी आपल्यातील खेळाडू जिवंत ठेवला आहे. ध्येय पार करण्याची जिद्द, अथक परिश्रम, चिकाटी आणि योग्य नियोजन याच्या बळावर त्यांनी हे यश मिळविेले असून या जागतिक पातळीवरील कॉम्रेड मॅरेथॉनमधील यशाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन व प्रशंसा करण्यात येत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal commissioner dr kailas shindes outstanding performance in comrade marathon in south africa mrj