नवी मुंबई : जादा दराच्या निविदांना कात्री लावून पालिकेच्या निधीची बचत करणारे नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्या बदलीचा घाट रचला जात आहे. चिक्कीऐवजी अल्पोपाहाराचा पर्याय देणाऱ्या आयुक्तांचा पुढील महिन्यात दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना या बदलीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आयुक्त व सत्ताधाऱ्यांचे काही प्रस्तावावरून चांगलेच बिनसले आहे.

राज्य सरकारच्या बेकायदेशीर बांधकामांना अभय देण्याच्या निर्णयाला विरोध केल्याने पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची दहा महिन्यांत बदली करण्यात आली. त्यांच्या जागी आलेले शांत, संयमी आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी गेली २३ महिने पालिका कारभाराला शिस्त लावली आहे. शहरातील प्रत्येक कामाची जातीने पाहणी केल्याशिवाय त्याला मंजुरी किंवा बिले न देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांची रोजीरोटी बंद झाली आहे. न्यूनतम दरात काम करावे लागत असल्याने पालिकेच्या कामांमुळे मस्तावलेले कंत्राटदार हात लावत नाही. त्यामुळे अनेक कामांची फेरनिविदा काढावी लागत आहे. मागील दोन वर्षांत साडेचार हजारांपेक्षा जास्त छोटी-मोठी कामे आयुक्तांनी मंजूर केलेली आहेत. पालिका शाळेतील विद्यार्थी गेली अनेक वर्षे चिक्की खाऊन कंटाळले असून त्या ऐवजी अल्पोपाहार देण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीने बहुमताच्या जोरावर फेटाळला. त्याऐवजी जुनी चिक्की विद्यार्थ्यांना खाणे भाग पाडले आहे. या विरोधात शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख व नगरसेवक किशोर पाटकर न्यायालयात गेले आहेत. शिवसेनेला न्यायालयात जाण्यास आयुक्तांनी भाग पाडल्याचा संशय सत्ताधारी पक्षांना आहे.

* लोकसभा निवडणुकीअगोदर डॉ. रामास्वामी यांची बदली करण्याचा घाट सत्ताधारी पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या जवळील काही नेत्यांना हाताशी धरून घातला आहे. आयुक्तांना पुढील महिन्यात दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ते कारण देऊन त्यांची बदली करण्याची व्यूहरचना आखली जात असून त्यांच्या जागी आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्याला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Story img Loader