नवी मुंबई : येथील ऐरोली विभाग कार्यालय, राजमाता जिजाऊ रुग्णालय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच सेक्टर तीन आणि चार मधील रस्ते, पदपथांच्या कामांची पाहणी नवी मुंबई महापालिका आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही सुधारणा सुचविल्या. विभाग कार्यालयांमध्ये प्रभावी लोकाभिमुख कार्यप्रणाली राबविण्याचे व सुविधा पुरविण्याचे त्यांनी निर्देश दिले.

ऐरोली विभाग कार्यालयातील पाहणीमध्ये त्यांनी १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने अभ्यागतांसाठीच्या प्रतिक्षाकक्षातील आसनव्यवस्थेत वाढ करण्याचे व त्याठिकाणी पुस्तके, महापालिकेची माहितीपुस्तके ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच पिण्याच्या स्वच्छ व शुध्द पाण्याची व्यवस्था तसेच प्रसाधनगृहे नियमित स्वच्छ राहतील याची काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे पाणीपट्टी व करभरणा केंद्रांतील कामांना गती देऊन नागरिकांना ऑनलाईन करभरणा सोप्या व सोयीच्या पध्दतीने करता येऊ शकते याची माहिती द्यावी व तशाप्रकारचे फलक लावून प्रचार-प्रसिध्दी करण्यात यावी असेही आयुक्तांनी सूचित केले. विभाग कार्यालया शेजारील समाजमंदिर इमारतीची आवश्यक दुरूस्ती करून ती आणखी चांगल्या रितीने वापरात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नागरिकांना विविध कामांसाठी विभाग कार्यालयांमध्ये यावे लागते. त्यामुळे त्याठिकाणी नागरिकांची कामे विहित वेळेत सहजतेने व्हावीत. नागरिकांना त्रास होऊ नये अशा रितीने त्यांची बैठक व्यवस्था व इतर सेवा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कार्यालयीन स्वच्छता व सुविधांवर भर देण्यात येत आहे.

डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.