महापालिकेच्या परिवहन समितीमधील ६ सदस्यांच्या निवडीवरून नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत गदारोळ झाला. ही निवडणूक प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप करत सेना नगरसेवकांनी सभागृहात पालिका सचिवांसमोरील विषयपत्रिका फाडल्या, तसेच खुच्र्याची आदळआपट करत आयुक्तांच्या हातातील राजदंड सभागृहाबाहेर पळवला. राष्ट्रवादीने याच गोंधळात  सर्व ६ सदस्य निवडून आल्याचे जाहीर करत शिवसेनेला धक्का दिला.

परिवहन समितीतील ६ सदस्यांचा कार्यकाल १ जुलै रोजी संपत आहे. निवडणुकीसाठी शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे ५ व काँग्रेसचा १ असे ८ जण रिंगणात होते. शनिवारी महासभा सुरू झाल्यानंतर पटलावर परिवहन सदस्य निवडीचा प्रस्ताव येताच सचिव चित्रा बावीस्कर यांनी निवडणुकीबाबत स्पष्टीकरण देत नियमानुसार हात वर करून निवड करता येते हे स्पष्ट केले. त्यावर शिवसेनेचे विजय चौगुले व द्वारकानाथ भोईर यांनी बोलण्याची परवानगी मागितली असता ती महापौरांनी नाकारली. त्यानंतर गोंधळ झाला. नियमानुसार ही प्रक्रिया राबवली आहे. शिवसेनेने सदस्य निवडून येत नसल्याचे पाहून सभागृहात गोंधळ घातला असा आरोप महापौर जयवंत सुतार यांनी केला आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणांची तक्रार सरकारकडे करणार असल्याचे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले.