नवी मुंबई : उत्पन्नाता मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली व्हावी यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने यंदा कंबर कसली आहे. ४२५ बड्या थकबाकीदारांना नव्याने नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. वारंवार नोटीसा देऊनही मालमत्ता कर थकविणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे तसेच एक एप्रिलपासून अशा मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णयही आयुक्त डाॅ.कैलास शिंदे यांनी घेतला आहे. गेल्या काही वर्षांत महापालिकेमार्फत थकबाकीदारांविरोधात सुरू करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
नवी मुंबई महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षांत ८०० कोटी रुपयांच्या मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट आखले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल असा दावा आयुक्त डाॅ. शिंदे यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना केला होता. याशिवाय नव्या आर्थिक वर्षात १२०० कोटी रुपयांची कर वसुली केली जाईल, असा दावाही अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मालमत्ता कराच्या माध्यमातून अधिक उत्पन्न गोळा होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र मालमत्ता कर विभागामार्फत म्हणाव्या त्या प्रमाणात त्यासाठी प्रयत्न होत नाहीत, अशा तक्रारीही आहेत. असे असताना यंदाचे आर्थिक वर्ष संपत असताना महापालिका प्रशासनाने या आघाडीवर जोरदार प्रयत्न सुरू केले असून मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता लिलाव करण्याचे वेळापत्रकच जाहीर केले आहे.
नोटिसांचा धडाका
मालमत्ता कर विभागाने जप्त मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण आठ विभागांमध्ये ४५४ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने जप्तीची कारवाई प्रस्तावित असलेल्या मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ताकर त्वरित भरावा असे आवाहन डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे. अन्यथा जप्त मालमत्तांवर एप्रिल २०२५ पासून लिलाव कारवाई करण्यात येईल असेही ठरविण्यात आले आहे. थकीत मालमत्ताकराच्या वसूलीसाठी जप्त केलेल्या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करणे तसेच त्यासाठी मालमत्तेचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे. जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलाव मूल्यांकनासाठी अधिकृत शासकीय मूल्यकारांची (गर्व्हनमेंट व्हॅल्युअर्स) नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त डाॅ.शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
एकीकडे थकबाकीदारांविरोधात कारवाई करत असताना महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेचा लाभ घ्या असे आवाहनही करण्यात आले आहे. महानगरपालिकेने १० मार्च २०२५ पासून ‘अभय योजना’ सुरू केली आहे. थकीत कराच्या विलंब शुल्कावर ५० टक्के सूट देणाऱ्या अभय योजनेचा ३१ मार्च २०२५ पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी (शनिवार – रविवार) नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय व इतर विभागीय कार्यालयांमध्ये कर भरणा केंद्र सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सुरू राहतील असेही महानगरपालिकेमार्फत सूचित करण्यात आले आहे.