नवी मुंबई : मालमत्ता कर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्वाचा स्रोत असून मालमत्ता करामार्फत प्राप्त होणाऱ्या निधीतून विविध नागरी सुविधा कामे करण्यात येत असतात. त्यादृष्टीने मालमत्ताकर वसुलीचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही पालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत असून नागरिकांनीही ३१ मार्चपूर्वी मालमत्ता कर भरण्याचे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
पालिकेच्यावतीने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘मालमत्ताकर अभय योजना’ अंतर्गत २१ मार्चपासून ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत मालमत्ता करासह शास्तीची केवळ ५० टक्के रक्कम भरणा करावी लागणार आहे. म्हणजेच शास्तीच्या रक्कमेत ५० टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे मालमत्ताकर अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी थकीत मालमत्ताकरावरील शास्तीच्या रक्कमेत भरीव सूट प्राप्त करुन घ्यावी असे आवाहन केले आहे. मालमत्ताकर भरणा केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुट्टीच्या दिवशीही कार्यरत असून पालिकेच्या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या घरातूनच ऑनलाईन करभरणा करू शकतात.
हेही वाचा – ‘त्या’ बोगस पोलिसाला बॅच कोणती ते सांगता आले नाही
हेही वाचा – …तरीही नवनीत राणा खासदार, पण रश्मी बर्वे मात्र बाद
८०० कोटींचे लक्ष्य गाठणार का?
महापालिकेचे मालमत्ता कर वसुलीचे ८०० कोटींचे लक्ष्य आहे. लिडार सर्वेक्षणामुळे मालमत्ता कर वसुलीचे लक्ष अधिक असून गेल्यावर्षीच्या आर्थिक वर्षातही पालिकेने रेकॉर्ड ब्रेक ६३० कोटी वसुली केली होती. त्यामुळे यंदा पालिका ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य गाठणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.