कोणतीही करवाढ नाही; आरोग्य, पाणीपुरवठा योजनांवर भर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणतीही दरवाढ नसलेला २०१९-२०चा अर्थसंकल्प नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी शनिवारी स्थायी समितीसमोर सादर केला. या वर्षी ९१० कोटी १५ लाख आरंभीच्या शिलकेसह ३ हजार ४५५ कोटी ६४ लाख कोटींची जमा तसेच ३४५४ कोटी ७३ लाख खर्चाचा व ९१ लाख रुपये शिलकीचा मूळ अंदाज स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षांत ३ हजार १२१ कोटी ९३ लाखाचे अंदाज सादर करण्यात आला होता. त्यामुळे गतवर्षीपेक्षा ३३४ कोटी अधिक जमा रकमेचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी स्थायी समितीसमोर सादर केला.

श्रीमंत महापालिका म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. यंदा पालिकेच्या तिजोरीत ३३४ कोटींची वाढ झाल्यामुळे शहराच्या विकासासाठी अधिक निधी वापरता येणार असून शहरात नागरिकांच्या हितासाठी भविष्याचा विचार करता हा अर्थसंकल्प नवी मुंबईकरांना भौतिक व नागरी सुविधा देण्याबरोबरच जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य, शिक्षण, परिवहन, पर्यटन यासारख्या चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामे निश्चित करण्यात आली असून पर्यावरणपूरक योजनांवरही भर दिला जाणार आहे.

मात्र मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ५०० चौफुटांच्या घरांना कर माफ करता येणार नसल्याचे प्रतिपादन पालिका आयुक्तांनी केले आहे. डॉ. रामास्वामी यांच्या पालिकेच्या कारकिर्दीतील सलग दुसरा अर्थसंकल्प आहे. उपलब्ध असलेल्या आर्थिक स्रोतांपासून अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. ई-गव्हर्नसच्या प्रभावी वापराने पालिकेचा कारभार गतिमान, लोकाभिमुख, पारदर्शक करण्यात येत असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. आगामी वर्षांत वाशी, नेरुळ, ऐरोली येथील आरोग्यसेवांसह विविध प्रकल्प पूर्ण करण्याचे उदिष्ट असल्याचे आयुक्तांनी म्हटले.

नवी मुंबई महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षांच्या अंदाजामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आली नसून शहरात आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. शहरात आरोग्य, शिक्षण याबरोबरच सर्वच नागरी सुविधा अधिकाधिक दर्जेदार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून पर्यटन, नागरिकांची सुरक्षा याबाबतही महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.  – डॉ. रामास्वामी एन, आयुक्त, नवी मुंबई महापालिका