नवी मुंबई-  नवी मुंबई महापालिकेत ज्येष्ठ नागरिकांचा आधार ठरणारी अनेक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. दुसरीकडे देशभरात ज्येष्ठ नागरिकांना  आधार देणारे व त्यांची शुश्रूषा करणारे सामाजिक व खासगी संस्थांचे हजारो वृद्धाश्रम देशभरात आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देशात व राज्यात प्रथमच नवी मुंबई महापालिका वृद्धाश्रम तयार करणारे पहिले शहर ठरले असून सीवू्डस येथील वृद्धाश्रमाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता प्रत्यक्षात वृद्धाश्रम कधी सुरू होणार याची उत्सुकता आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई न्यायालय राज्यातील पहिले डिजिटल कोर्ट; न्यायमूर्ती गौतम पटेल यांचे प्रतिपादन

वृद्धाश्रम इमारतीचे काम अभियंता विभागाकडून पूर्ण करण्यात आले  आहे. महाराष्ट्रात प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघात असे वृद्धाश्रम उभारल्यास या ज्येष्ठांना जगण्याची नवी ऊर्मी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पालिकेच्या मागणीनुसार सिडकोकडून पालिकेला भूखंड हस्तांतरित झाल्यानंतर पालिकेकडून वृद्धाश्रमाच्या  प्रत्यक्ष कामाला  सुरुवात झाली. पालिकेचा पहिला वृद्धाश्रम २०२२ पर्यंत आकारास येणार होता परंतु करोनाच्या अडथळ्यामुळे कामाला विलंब झाला. परंतु आता याचे काम वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. धावपळीच्या जीवनात वृद्धांची शुश्रूषा करणाऱ्यांचे प्रमाण चांगले असून आपल्या ज्येष्ठांबाबत आदर व आपुलकीने सेवा करणाऱ्यांबरोबरच दुसरीकडे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना  गैरसोयीमुळे तसेच कौटुंबिक अडचणींमुळे वृद्धाश्रमात ठेवण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळते.  विभक्त कुटुंब पद्धती व बदलणारा काळ यामुळे वृद्धाश्रमाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>> वी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा अचानक खंडित

नवी मुंबई महापालिकेने शहरात ज्येष्ठांना आधार व विरंगुळा देणारी अनेक ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे निर्माण केली आहेत. आपल्या जीवनाच्या सरत्या काळात आनंदाची, आपलेपणाची, आपुलकीची व प्रेम देणारी केंद्रे अशी ओळख या पालिकेच्या विरंगुळा केंद्रांची झाली असून शहरातील लाखो ज्येष्ठांना ही केंद्रे आधार वाटत आहेत. एकत्र येऊन विविध कार्यक्रम, वाचनालयाची सुविधा, करमणुकीची साधने पालिकेने या ठिकाणी दिली असताना दुसरीकडे पालिकेच्या इतिहासात प्रथमच वृद्धाश्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. शहरातील पालिकेचे पहिले वृद्धाश्रम सीवूड्स येथे तयार करण्यात आले आहे. मुंबई, नवी मुंबई शहराबरोबरच पनवेल आणि राज्य व देशभरात खासगी संस्थांचे वृद्धाश्रम असून नवी मुंबईत महापालिकेचे निर्माण होणारे वृद्धाश्रम हे देशभरातील व राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे पहिले वृद्धाश्रम बांधून तयार आहे. बेलापूर विभागातील नेरुळ सेक्टर-३८ येथील भूखंड क्रमांक १३ येथे हा वृद्धाश्रम निर्माण करण्यात आला असून वृद्धाश्रमाच्या इमारतीचे उद्घाटन प्रतीक्षेत आहे. वृद्धाश्रम इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले. इमारत मालमत्ता विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

नवी मुंबई शहरात  वृद्धाश्रम उभारण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यानुसार शहरात पालिकेचा पहिला वृद्धाश्रम आकारास आला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक आमदाराने आपल्या विभागात वृद्धाश्रम निर्माण केला तर ज्येष्ठांसाठी हक्काची वास्तू निर्माण होईल व प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला जगण्याची ऊर्मी निर्माण होईल. या ठिकाणी वास्तू झाल्यानंतर वृद्धांची वैद्यकीय तपासणी व इतर सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. ज्येष्ठांच्या मागणीनुसार आपण सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते  उद् घाटन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

शहरातील पालिकेचा वृद्धाश्रम

ठिकाण- नेरुळ सेक्टर-३८ ,भूखंड क्रमांक- १३

प्रस्तावित खर्च -४ कोटी १० लाख, ५९ हजार

एकूण बांधकाम -९७६३ चौरस फूट

Story img Loader