लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : बेकायदा बांधकामे, ऑर्केस्ट्रा बार, हॉटेलांमधील वाढीव बांधकामे तसेच वाशी एमपीएमसी परिसरातील व्यापाऱ्यांनी मन मानेल त्या पद्धतीने केलेली अतिक्रमणे पाडून गेल्या पंधरवड्यापासून प्रकाशझोतात आलेले महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाचे प्रमुख उपायुक्त राहुल गेठे यांची या पदावरुन तडकाफडकी बदली करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या विभागाचा कारभार पुन्हा उपायुक्त सोमनाथ पोटरे यांच्याकडे सोपविण्यात आला असून गेठे यांच्याकडे मालमत्ता विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणारे गेठे यांची नुकतीच नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेत कायमस्वरूपी पद्धतीने त्यांचे शासन स्तरावरून झालेले समायोजन चर्चेचा विषय ठरला होता. उपायुक्तपदी रुजू होताच त्यांच्याकडे अतिक्रमण नियंत्रण विभागासारखे प्रभावी पद सोपविले.
आणखी वाचा-प्रेमसंबंधातून लेडीजबारमध्ये गोळीबार, पनवेलमधील घटना
या पदाचा कार्यभार गेली अनेक वर्षे अमरीश पटनिगीरे यांच्याकडे होता. पटनिगीरे यांच्या कार्यकाळात नवी मुंबईतील ग्रामीण तसेच शहरी भागात बेकायदा बांधकामांचा अक्षरश: पूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी मन मानेल त्या पद्धतीने केलेली वाढीव बांधकामे, मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणे, ठिकठिकाणी बेकायदा इमारती, शहरी भागात पालिकेची परवानगी न घेता होणारी वाढीव मजल्यांची बांधकामांकडे महापालिकेतील विभाग स्तरावरून पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
एरवी नियोजित समजल्या जाणाºया नवी मुंबईला ठाणे, डोंबिवलीप्रमाणे अवकळा येत असल्याची ओरडही सातत्याने होत आहे.
गेठे प्रकाशझोतात आणि वादातही
मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अशी ओळख असणारे डॉ. गेठे यांच्याकडे अतिक्रमण नियंत्रण विभागाचा कार्यभार येताच त्यांनी बेलापूरपासून घणसोलीपर्यंत जोरदार मोहीम हाती घेतली. बेलापूर सेक्टर १५ येथील हॉटेल मालकांनी मार्जिनल स्पेसमध्ये केलेली अतिक्रमणे महापालिकेने पाडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर महापालिकेचे पथक दररोज वेगवेगळ्या विभागांमध्ये कारवाया करताना दिसले. डॉ. गेठे हे मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असल्याने या मोहिमांना स्थानिक पोलीस यंत्रणेचेही पाठबळ मिळत होते. बिथरलेल्या काही हॉटेल मालकांनी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तक्रारी केल्या होत्या.
आणखी वाचा-नवी मुंबई : महापालिकांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी
एपीएमसीची कारवाई अंगलट?
दरम्यान डॉ. गेठे यांच्या नेतृत्वाखाली एपीएमसी परिसरातील व्यापाºयांनी केलेल्या अतिक्रमणांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. तसेच सतरा प्लाझा परिसरातील बेकायदा गॅरेज, बारची वाढीव बांधकामेही महपालिकेने पाडली. या मोठ्या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ही कारवाई होऊन आठवडा उलटत नाही तोच डॉ. गेठे यांच्याकडील अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या उपायुक्तपदाचा कार्यभार काढून घेण्याचा निर्णय झाल्याने उलटसुलट चर्चांना तोंड फुटले आहे. हा कार्यभार का काढून घेतला याविषयीचे कोणतेही कारण पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
महत्त्वाच्या कारवाया
- १२ ऑक्टोबर – गोठिवली व घणसोलीतील अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई केली.
- १३ ऑक्टोबर – बेलापूर सेक्टर १५ परिसरातील तोडक कारवाई, २५ लाख रुपयांचा दंड
- २० ऑक्टोबर – डीपीएस शाळा परिसरातील शाळेने बेकायदा बांधलेल्या कामावर कारवाई – २ लाखांचा दंड
- २५ ऑक्टोबर सतरा प्लाझा परिसरात ३०० पेक्षा अधिक बेकायदा कामावर कारवाई – ७२ लाख ९८५० रुपये दंड