नवी मुंबई : शहरात नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नव्याने नियोजन करून एकाचवेळी सलग सहा ते सात तास पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग सुरू केला होता. परंतु, विविध विभागांतील तक्रारीनंतर पुन्हा शहरात जुन्या वेळापत्रकानुसारच पाणीपुरवठा केला जाणार आहे. दरम्यान, बदललेल्या वेळेचा नियोजन हे जलकुंभांच्या पुरवठ्यासाठी होते, असे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे.

मागील शनिवारपासून शहरात विविध विभागात सकाळ, संध्याकाळी दोन वेळे ऐवजी फक्त एकाच वेळी सलग ६ ते ७ तास पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे घणसोली, नेरुळ, ऐरोली येथील नागरीकांनी पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. आ. गणेश नाईक यांनीही पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत पालिका प्रशासनाला फैलावर घेत पाण्याचे राजकारण शहरात चालू देणार नसल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पालिका प्रशासनाने फक्त एक वेळचा सलग ६ ते ७ तासाचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन हे फक्त शहरातील ५७ जलकुंभांच्या पाणीसाठ्यासाठी होते. नवी मुंबई शहरात मात्र जुन्याच पध्दतीने विभागवार दोन वेळेस सकाळी व संध्याकाळी नागरीकांना पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने ‘लोकसत्ता’ला दिली आहे. नवीन नियोजनानुसार जुलकुंभाच्या ठिकाणी जमा होणारे पाणी एकाचवेळी जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतू शहरात नागरीकांना होणारा पाणीपुरवठा हा पूर्वीप्रमाणेच विभागवार सकाळी व संध्याकाळी असा दोन वेळेत दिला जात आहे असे स्पष्टीकरण देण्यात आले होते.

हेही वाचा >>>नवी मुंबईत मंगळवारी ठराविक काळात अवजड वाहनांना प्रवेश बंदी

बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे भागात पहाटे ४.३० ते सकाळी ११.३० वा., घणसोली विभागात सायंकाळी ८.३० ते रात्री २.०० वा. तसेच ऐरोली व दिघा विभागात दुपारी २.०० ते पहाटे ४.०० वा. या वेळेत विभागनिहाय जलकुंभ भरले जाणार असल्याने एकाच वेळी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थापनावर येणारा ताण विभागला जाणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना पूर्वीच्याच प्रचलित वेळी पूर्वीसारखाच सकाळी व संध्याकाळी पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र या नवीन नियोजनामुळे नागरिकांना पुरेशा दाबाने समाधानकारक पाणीपुरवठा उपलब्ध होईल. पाणीपुरवठ्याची ही नवीन प्रणाली राबविण्यास प्रायोगिक तत्वावर सुरूवात करण्यात आली आहे.

Story img Loader