नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या पामबीच मार्गालगत फ्लेमिंगो अधिवास क्षेत्रात बेकायदा राडारोडा टाकण्यात येत असून याविरोधात पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला असून याबाबत कांदळवन विभागाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी फ्लेमिंगो अधिवास क्षेत्राची प्रत्यक्षात पाहणी करून या परिसरात टाकलेला राडारोडा उचलण्यास सुरुवात केली असून पामबीच मार्गाच्या नजीक असलेल्या व राडारोडा घेऊन कांदळवनात जाणाऱ्या वाहनांचा अटकाव करण्यासाठी या ठिकाणी लोखंडी कठडा बसवण्याचे आदेश अभियंता विभागाला देण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली आहे. कांदळवन क्षेत्रात कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना पालिकेने बेकायदा सौरऊर्जेवरील पथदिवे लावण्यात आले होते तर दुसरीकडे येथे रात्रीच्या वेळी राडारोडा टाकण्याचे काम केले जाते. त्यामुळे या भागात विविध ठिकाणी राडारोडा पडल्याचे पाहायला मिळत होते.

हेही वाचा : नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?

याबाबत ‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त देताच या परिसरात पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी करून या ठिकाणी टाकलेला राडारोडा हटवण्यात आला आहे. मुख्य पामबीच मार्गावरून ठिकाणी पायवाट होती. परंतु येथील ‘रेलिंग’ तोडून राडारोडा टाकण्याच्या गाड्या जा-ये करतील असा कच्चा रस्ता तयार केला असून रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने राडारोडा टाकला जात होता. आता पालिकेने हा राडारोडा उचलून पालिकेच्या अभियंता विभागाला या ठिकाणी तात्काळ लोखंडी कठडा उभारण्याचे आदेश दिले आहेत. शहरभर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून फ्लेमिंगोच्या प्रतिकृती लावण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे याच फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळी नसल्याचे दाखवण्यात आल्याने महापालिका प्रशासन सिडको व राज्य शासन यांच्या विरोधात पर्यावरणप्रेमींमध्ये संताप असताना राडारोडा टाकण्याकडेही दुर्लक्ष करण्यात येत होते.

हेही वाचा : कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले

फ्लेमिंगो सिटीचे नाव जपण्याची गरज

एकीकडे नवी मुंबईच्या पामबीच मार्गाजवळ लाखो फ्लेमिंगो पक्षी विहार करतात. परंतु येथील जागा एका खासगी विकासकाला देऊन येथील पर्यावरणावर व फ्लेमिंगो सिटीची ओळख पुसण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही घटकांकडून सुरू असून त्याला पर्यावरणप्रेमीही विरोध करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पामबीच मार्गालगत टाकण्यात येत असलेल्या राडारोड्याची प्रत्यक्ष पाहणी करून या ठिकाणचा राडारोडा उचलण्यात आला आहे. तसेच पामबीच मार्गालगत असलेले व काढून टाकण्यात आलेले लोखंडी कठडा बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सोमनाथ पोटरे, उपायुक्त, परिमंडळ १

Story img Loader