नवी मुंबई : मालमत्ताकराचे थकबाकीदार असलेल्या व्यक्ती, संस्था यांना आवाहन करूनही तसेच नोटीस बजावूनही त्यांच्यामार्फत प्रतिसाद न देणाऱ्या १२८ थकबाकीदारांवर नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता जप्तीची कारवाई केली. यामधील ३० थकबाकीदारांनी नोटीस मिळाल्यानंतर आपली थकबाकी व मालमत्ताकर जमा केला असून त्यापोटी महानगरपालिकेकडे ७ कोटी ४८ लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेच्या मालमत्ता विभागाने केलेल्या कारवाईमध्ये अमेय को-ऑप.हौ.सोसायटीमधील ३ थकबाकीदारांनी थकीत मालमत्ताकर भरणा करणेबाबत बजावलेल्या नोटिशीकडे दुर्लक्ष केल्याने या तिन्ही मालमत्ता टाळे लावून सीलबंद करण्यात आल्या. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार १ लाखापेक्षा अधिक रक्कमेचे थकबाकीदार असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची उतरत्या क्रमाने यादी तयार करण्यात आली होती. यामधील ८ हजार मोठ्या थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत देऊन नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटीसांनाही प्रतिसाद न देणाऱ्या १२८ थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती मालमत्ता कर विभागाचे उपआयुक्त शरद पवार यांनी दिली.

थकबाकीदारांच्या यादीनुसार यापुढील काळात थकबाकीदार सोसायट्यांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता जप्तीची कारवाई करूनही थकबाकी न भरता नोटीसीला प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे.

कोट – नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता करामधूनच नागरी सुविधांची पूर्तता केली जात असल्याने प्रत्येकाने आपली करभरणा वेळेत व नियमित करावी तसेच थकबाकी असल्यास तीही वेळेत भरुन नवी मुंबई शहर विकासात आपला सहभाग दयावा.अन्यथा कारवाईला सामोरे जावेच लागेल. डॉ.कैलास शिंदे ,आयुक्त नवी मुंबई महापालिका