नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका हद्दीत साफ सफाई, आरोग्य, उद्यान, पाणी पुरवठा या सारख्या विभागांमध्ये कार्यरत असलेल्या पाच हजारांहून अधिक कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिल्याने शहरातील या सर्व सेवा सुरळीत राखण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासना समोर असणार आहे. दरम्यान, हा संप नियमबाह्य असून महापालिका प्रशासन नेहमीच कामगारांच्या हिताचे निर्णय घेत आला आहे, त्यामुळे हा संप मागे घेण्यात यावा असे आवाहन आयुक्त डाॅ. कैलाश शिंदे यांनी केला आहे.
शहरातील वेगवेगळ्या नागरीसेवा या कंत्राटदार नियुक्तकरून कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत करून घेण्याची कार्यपद्धती महापालिका प्रशासनाने अनेक वर्षांपासून अवलंबली आहे. शहराच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये पाच हजारांहून अधिक कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे या मागणीसाठी समाज समता कामगार संघ या संघटनेने सोमवारपासून बेमूदत संपाची हाक दिली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालय्च्या २०१३च्या निर्णयानुसार, कंत्राटी कामगारांना समानकाम समान वेतन प्रथमदर्शनी लागू होत नाही असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार, वेतन, भत्ते, बोनस नियमीतपणे दिले जातात. असे असताना कामगार संघटनेने संपाचा इशारा दिल्याने नवी मुंबईत कधी नव्हे ते आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्याकाही महिन्यांपासून कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळावे यासाठी महापालिका स्तरावर अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन यानुसार दिल्यास विद्यमान दिल्या जाणाऱ्या किमान वेतनापेक्षा कामगारांना कमी पगार मिळेल असे निदर्शनास आले आहे. या संबंधिचा अहवालाही महापालिकेने कामगार संघटनेपुढे सादर केला आहे. असे असतानाही संघटनेने संपाचा इशारा दिला असून हा संप बेकायदेशीर असल्याचे मत महापालिका प्रशासनाने पत्रकारांना पाठविलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे. महापालिकेने या संदर्भात नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल येत नाही.तोवर संप करू नये असे आवाहन केले आहे. दरम्यान तरीही समता कामगार संघटनेने संपाचा इशारा दिल्यामुळे सोमवारपासून शहारातील नागरी सुविधांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, एकूण कंत्राटी कामगारांपैकी जेमतेम दीड ते दोन हजार कामगार संपावर जाण्याची शक्यता असून या कामगारांच्या बदल्यात नाका कामगार, तसेच इतर विभागातील कामगारांचे नियोजन केले जात आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.