लोकसंख्येने पर्यायी प्रवासी संख्येने झपाटय़ाने वाढणाऱ्या नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज भागविता यावी यासाठी वीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमात आता राज्य शासनाच्या तेजस्विनी योजनेंतर्गत आणखी ५० बसची भर पडणार आहे. शासनाने खास महिलासांठी राज्यातील सहा महापालिकांना ३०० बसगाडय़ा देण्याची घोषणा केली असून नवी मुंबई पालिकेने त्यात ५० बसची मागणी केली आहे.
भौगोलिकदृष्टय़ा मुंबई एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या नवी मुंबईतील प्रवाशांची ने-आण करण्यासाठी २३ जानेवारी १९९६ रोजी पालिकेने स्वतंत्र परिवहन सेवा सुरू केली. परिवहन उपक्रमाच्या ३६० बसगाडय़ा सध्या विविध मार्गावर धावत असून बेस्ट आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सेवा कायम ठेवली आहे. त्यामुळे नवी मुंबईत चांगल्या सार्वजनिक सेवेची आजही नितांत गरज असून परिवहन उपक्रम अद्ययावत आणि आधुनिक करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी नुकत्याच एसी व्होल्वो बस सेवेत रुजू करण्यात आलेल्या आहेत. हायब्रीड बसेसचा पहिला प्रयोग नवी मुंंबईत होणार आहे. येत्या काळात जेनएनआरयूएमअंतर्गत १४० आणखी बस परिवहन ताफ्यात येणार आहेत.
राज्य शासनाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर या सहा पालिकांसाठी तेजस्विनी योजनेंतर्गत मंजूर केलेल्या ३०० बसगाडय़ांमधील वाटादेखील पालिकेच्या वाटय़ाला येणार आहे. त्यासाठी शहरातील मार्गाचा आराखडा नगरविकास विभागाने मागितला असून तो तयार करण्याचे काम परिवहन विभाग करीत आहे. या बसगाडय़ा खासकरून महिलांसाठी राखीव ठेवल्या जाणार असून शहरातील सर्व रेल्वे स्थानकांना जोडल्या जाणार आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या मोठय़ा पालिकांच्या वाटय़ाला जादा बसगाडय़ा दिल्या जाणार आहेत. नवी मुंबई ही या पालिकेच्या दृष्टीने छोटी पालिका असल्याने दहा ते वीस बसगाडय़ा दिल्या जाण्याची शक्यता आहे, मात्र परिवहन उपक्रम जादा बसगाडय़ांची मागणी करणार असून शासन देईल तेवढय़ा बसगाडय़ा पदरात पाडून घेतल्या जाणार आहेत.
३६० – बसगाडय़ा सध्या परिवहन उपक्रमाच्या विविध मार्गावर धावत आहेत.
५० -बसगाडय़ांची भर शासनाच्या तेजस्विनी योजनेंतर्गत पडणार आहे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा