नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत गेल्या वर्षापेक्षा ६७.०५ कोटी अधिक मालमत्ता करवसुली केली आहे. उर्वरित तीन महिन्यांत अधिक जोमाने वसुली करून अर्थसंकल्पातील ८०० कोटींचे लक्ष्य पूर्ण करण्याचा निश्चय महापालिकेने केला आहे. यामुळे महापालिका इतिहासात प्रथमच ८०० कोटींची मालमत्ता करवसुली होईल, असा विश्वास महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व मालमत्ता कर उपायुक्त सुजाता ढोले यांनी व्यक्त केला.
हेही वाचा >>> मुंबई महानगरात प्रवेश करण्यासाठी एकच टोल ? भाजपा जाहिरनाम्यात घोषणा करणार ?
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात मालमत्ता कर हे प्रमुख स्रोत आहे. यामधूनच शहरात सोयीसुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध होत असल्याने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने नियोजनबद्ध वसुली आणि त्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर विशेष लक्ष दिल्यानेच यावर्षी १ एप्रिल २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत ४६५.७० कोटी मालमत्ता कर वसुली करण्यात आली. मागील वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत ३९८.६५ कोटी कर वसुली झाली होती. यावर्षी ६७.०५ कोटी रकमेची अधिक कर वसुली झाल्याने महानगरपालिकेच्या सेवा सुविधांकरिता अधिकचा निधी उपलब्ध झाला आहे.
महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात ८०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने ९ महिन्यांत ६७ कोटीपेक्षा अधिक करवसुली केली. – सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त व मालमत्ता कर उपायुक्त