नवी मुंबई : शहराच्या विविध विभागांत पावसाळापूर्व कामांच्या नावाखाली अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. परंतु दर्जाहीन कामामुळे एक-दीड महिन्यात हे रस्ते उखडल्याचे चित्र पाहायला मिळत असून पालिकेला ठेकेदाराने डांबरीकरणात चक्क वाळू भरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालिकेला अशा रस्त्यावरील वाळू उकरून बाहेर काढण्याची नामुष्की ओढवली आहे. तर त्यापुढे याच रस्त्यावर नव्याने निव्वळ डांबराचा मुलामा दिल्यामुळे सायकल, दुचाकी घसरून नेरुळ येथे दोन शाळकरी मुले जखमी झाल्याचे पाहायला मिळाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्ता दुरुस्त केल्यावर किंवा त्याचे डांबरीकरण केल्यावर त्याला निश्चित असा दोष निवारण कालावधी ठरलेला असतो. त्यामुळे एक-दीड महिन्यात रस्ता पूर्ण उखडून जात असेल तर त्या ठेकेदारावर पालिका कधी कारवाई करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्डे बुजवण्यासाठी देण्यात येणाऱ्या कंत्राटामध्ये पारदर्शकता नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याने असे प्रकार समोर येत आहेत. महापौर निवास असलेल्या पारसिक हिलवरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम याच मे महिन्याच्या अखेरीस करण्यात आले. परंतु, पावसाळ्याच्या अर्ध्या कालावधीतच चक्क रस्त्यावरील डांबर व खडी वाहून गेली असून मागील दोन दिवस पुन्हा रस्ता करण्यासाठी रस्त्यावरील खडी बाजूला करण्याचे काम करण्यात येत आहे.

हेही वाचा : पनवेलमध्ये १२ हजार हेक्टर भातशेती हद्दपार

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण फुटबॉल मैदानासमोरील रस्ता, अगदी १९ सेक्टर येथील डी मार्ट चौकापर्यंत मे महिन्यात डांबरीकरण केला. परंतु, याच रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली. चक्क डांबरीकरणाच्या नावाने भरलेली वाळू काढून ठेकेदाराला पदपथावर टाकावी लागली आहे. याच मार्गावर मंगळवारी गाडी घसरून दोन शाळकरी मुले जखमी झाली. यशवंतराव चव्हाण उद्यानाच्या परिसरात वंडर्स पार्क तसेच अनेक मोठमोठी उद्याने आहेत. त्यामुळे या भागात नागरिकांची सातत्याने वर्दळ असते. परंतु, पालिकेच्या दर्जाहीन कामामुळे नागरिकांमध्ये संताप असल्याचे पाहायला मिळत आहे.

चौकांच्या ठिकाणचे डांबरीकरण उखडले

शहरात विविध चौकांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. अनेक चौकांचे काम अर्धवट आहे. त्यामुळे संपूर्ण बेलापूर ते दिघा विभागात ज्या ज्या ठिकाणी चौकांच्या काँक्रीटीकरणाचे काम झाले आहे, त्याच्या शेजारचे डांबरीकरण उखडले असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: भक्कम इमारतीही पुनर्विकास सापळ्यात; घणसोली परिसरात माफियांचे पेव, खासगी संस्थांच्या अहवालावर इमारती धोकादायक ठरवण्याचे प्रकार

पालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या कामात अधिकाऱ्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत सर्वच जण ठेकेदाराकडून वसुली करत असल्यामुळे ठेक्याच्या उरलेल्या पैशात केलेल्या कामांचा दर्जा असाच असणार. चांगला रस्ता असताना त्याची कामे करून उलट वाट लावली.

शरद नाईक, नागरिक
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation digging roads mixed with sand css