नवी मुंबई महानगरपालिकेने महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीच्या अनुषंगाने दिवाळी फराळ, कंदील, पणत्या इत्यादी साहित्य विक्रीसाठी प्रदर्शन विक्री केंद्र उपलब्ध केले आहेत. करोना काळात आर्थिक परिस्थिती खालावली होती तर काहींचे रोजगार गेले होते. त्यामुळे यंदा महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामाध्यमातून आर्थिक पाठबळ देण्याचे उद्दिष्ट असल्याचे महापालिकेने सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या समाज विकास विभागाने महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करण्याचा निश्चय करण्यात आला. त्या अनुषंगाने नवी मुंबई शहरातील बेलापूर ,नेरुळ वाशी, तुर्भे ,कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा, सानपाडा या ठिकाणी एकूण ४३ प्रदर्शन विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या विभागातील रेल्वे स्थानक परिसर, मुख्य रस्ता लगत तसेच वर्दळीच्या ठिकाणी महिलांकरता हे स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. या प्रदर्शन विक्री स्टॉलच्या माध्यमातून महिलांना दिवाळी फराळ, कंदील, पणत्या इत्यादी दिवाळी साहित्य विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हेही वाचा- उरण : सिडकोने जमिनी न घेता नवी मुंबई सेझच्या जमिनी परत घेण्याची शेतकऱ्यांची मागणी
करोना काळात सर्वच उद्योग धंदे, व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे कित्येकांचे रोजगार गेले होते, तर काहींना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. यंदा अधिक उत्स्फूर्तपणे दिवाळी सण साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे मागील दोन वर्षे आर्थिक नुकसान झाले असून बचत गटातील महिलांना त्यांनी बनवलेल्या वस्तू, फराळ इत्यादी साहित्य विक्री करून आर्थिक हातभार लागेल या हेतूने नाममात्र दरात विक्री केंद्र उपलब्ध केले आहे, अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली आहे.