नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृक्षांवर खिळे ठोकून रोषणाई केली जाते. याबाबत पालिकेने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील पाच हॉटेलांसह दुकानदारांवर कारवाई करत ५० हजार दंड वसूल केला आहे. नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने नुकत्याच झालेल्या ठरावाप्रमाणे शहरातील वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे व वृक्षास इजा पोहचविणाऱ्या व्यक्ती, संस्था, व्यावसायिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला होता. त्यानुसार अशा नागरिक, संस्था, व्यावसायिक यांचेकडून प्रतिवृक्ष १० हजार इतका दंड आकारण्याची साहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी यांच्यामार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरात १९७ उद्याने असून रस्ता दुभाजक, ट्री बेल्ट व मोकळ्या जागा यांचे नैसर्गिक सौंदर्य अधिक वाढवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी पालिका जास्तीत जास्त वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे शहरात झाडाला खिळे ठोकून जाहिराती लावणे तसेच विद्युत रोषणाई करणे असे प्रकार वाढत असल्याने पालिकेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबईतील बेलापूर ते वाशी विभागात मोठ्या प्रमाणात झाडांवर रोषणाई तसेच खिळे ठोकून जाहिराती लावणे असे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता पालिकेने घेतलेल्या कारवाईचे नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींकडूनही स्वागत करण्यात येत आहे. परंतु एकीकडे परिमंडळ एकमध्ये कारवाई केली जात असताना दुसरीकडे परिमंडळ दोनमध्ये कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पालिकेने बेलापूर विभागातून कारवाईला सुरुवात केली असून आतापर्यंत परिमंडळ एकमध्ये ५० हजार दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच पालिकेच्याच भाड्याने दिल्या जाणाऱ्या वास्तूच्या ठिकाणी झाडांवर लाइटिंग लावण्यास बंदी असून असे आढळल्यास त्यावरही कारवाई करण्यात येईल.किसनराव पलांडे, उपायुक्त, नवी मुंबई महापालिका

नागरिकांची अपेक्षा

नवी मुंबई महापालिकेने एकीकडे शहरातील वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे याबाबत कारवाई सुरू केली असताना पालिकेच्याच विष्णुदास भावे नाट्यगृह, शहरातील विविध बहुउद्देशीय इमारती यांसह विविध वास्तूंच्या परिसरातील झाडांवर पालिकेनेच विद्युत रोषणाई करणे टाळायला हवे. वाशीतील नाट्यगृह परिसरात राजकीय कार्यक्रमांदरम्यानही परिसरातील झाडांवर विद्युत रोषणाई होणार नाही याबाबत पालिकेनेही खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.