लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : सण उत्सवाच्या काळात खरेदीसाठी बाजारात प्लास्टिकचा वाढलेला वापर लक्षात घेत, नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विशेष मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये विशेष भरारी पथके नेमण्यात आली असून पथकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. यात महापालिकेची भरारी पथके कार्यान्वित झाली असून मागील आठवड्यात परिमंडळ एकच्या पथकाने ३०० किलो प्रतिबंधात्मक साठा जप्त केला. त्याचप्रमाणे परिमंडळ दोन मध्ये उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली टोलनाका येथे पथकाने दुचाकीवरून वाहतूक होणारा १०० किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा ताब्यात घेण्यात आला.

तसेच, महापे गाव येथेही विद्युत दुचाकीवरून नेण्यात येत असलेला ४० किलो प्लास्टिकचा साठाही पथकाने जप्त केला. याच बरोबर दिघा, घणसोली येथील मिठाईच्या दुकानात प्लास्टिक पिशव्या आढळल्याने दुकानदारांवर पाच हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच ऐरोली येथील काही दुकानदारांकडून देखील दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे सुमारे ६ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर, घणसोली, वाशी, ऐरोली टोलनाका अशा विविध ठिकाणी पथकाने कारवाई करत प्लास्टिक साठा जप्त केला. याच अंतर्गत नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा पर्याय स्वीकारावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबईच्या महापालिकेच्य वतीने करण्यात येत आहे.

सतत कारवाईचे आदेश

नवी मुंबई महापालिका क्षेत्राला स्वच्छ भारत अभियानात देशात पहिल्या तीन क्रमांकाचे पारितोषिक मिळत आले आहे. या मोहिमेत प्लास्टिक वापराचे वाढते प्रमाण हा प्रमुख अडथळा ठरू लागल्याचे निरीक्षण काही स्वच्छता निरीक्षकांनी यापूर्वीही व्यक्त केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या बाजारपेठा या महापालिका हद्दीत येतात. त्यामुळे या बाजारांच्या परिसरातही प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठया प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे प्लास्टिक विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार विभाग स्तरावर यासंबंधीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली. शहरातील आणखी काही प्रमुख बाजारपेठांमध्ये येत्या काळात यासंबंधी विशेष मोहीम हाती घेतल्या जाणार आहेत.