नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १५ येथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बचत गटासाठी दिलेले स्टाॅल आणि अतिक्रमण विभागाची उदासीनता यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यात ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते अशा ठिकाणी ऐन रस्त्याच्या वळणावर जागा देण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यात मनपचाच उपक्रम असल्याने वाहतूक पोलिसांनी हतबलता व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बचत गटांना स्वयंरोजगारासाठी एक संधी मनपाने उपलब्ध करून दिली आहे. दिवाळी फराळ वा त्या निमित्ताने लागणाऱ्या वस्तूंच्या विक्रीसाठी शहरात दोनशे पेक्षा अधिक ठिकाणी बचत गटांसाठी स्टाॅल देण्यात आले आहेत. हा उपक्रम अत्यंत चांगला व बचत गटांना आर्थिक बळ देणारा आहे. या स्टाॅलची जागा निश्चिती विभाग कार्यालयाद्वारा करण्यात आली. मात्र कोपरखैरणे येथे सेक्टर १५ नाक्यावर देण्यात आलेल्या स्टाॅलमुळे वाहतूक कोंडीचे एक कारण ठरत आहे.  

हेही वाचा : नवी मुंबई महापालिकेच्या आयकॉनिक मुख्यालयाला आकर्षक झळाळी

ऐन वळणावर ही जागा देण्यात आली आहे. त्यात बांबू समोरच्या दिशेने रस्त्यावर लावण्यात आल्याने वाहन चालकांना वाहन वळवताना त्रास होत आहे. दुर्दैवाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बसणारे अनधिकृत फेरीवाले कायम डोकेदुखी आहे. त्यात दिवाळी असल्याने अशा फेरीवाल्यात भर पडत आहे. दिवाळी आहे त्यानिमित्ताने होतकरू गरीब लोकांना दोन चार दिवस रोजगार मिळतो, हे खरे आहे मात्र त्यांना बसण्यास योग्य जागा देत शिस्तीचे पालन केले तर त्यांचा व्यवसाय होईल आणि पादचाऱ्यांना त्रास न होता वाहतूकही सुरळीत राहील, अशी प्रतिक्रिया याच भागात राहणारे किरण माने यांनी दिली.

दिवाळीत सदर ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने योग्य ती काळजी घ्या अशी विनंती वाहतूक पोलिसांनी मनपाला केली होती. काळजी घ्या म्हणजे दिवाळी संबंधी साहित्य विक्री करणाऱ्यांव्यतिरिक्त अनधिकृत फेरीवाले त्यातल्या त्यात खाद्य पदार्थ विकणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाने निदान दिवाळीत तरी कारवाई करावी, हे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने वाहतूक कोंडी होतच होती, अशी माहिती एका वाहतूक पोलिसाने दिली. याबाबत कोपरखैरणे विभाग अधिकारी यांच्याशी अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

हेही वाचा : उरण : नव्या कायद्यात कामगारांच्या रोजगाराची शाश्वती नाही, कामगार नेते महेंद्र घरत यांचे मत

मात्र स्टाॅल बाबत समाज कल्याण विभागाचे उपायुक्त श्रीराम पवार यांनी सांगितले की हा उपक्रम आमच्या विभागामार्फत राबवला जात असला तरी जागा निश्चिती विभाग कार्यालय करते. वाहतूक कोंडी होत असेल तर योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जातील . 

हेही वाचा : उरणच्या पिरवाडी किनाऱ्याचा रत्नहार पर्यटकांसाठी सजणार

कोपरखैरणे भागात अनेक ठिकाणी दुकानदार आकाश कंदील दर्शीवण्यासाठी दुकान ते थेट रस्ता असा मांडव टाकून आकाश दिवे लावले आहेत. त्यामुळे पदपथावर आकाश दिवे पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी थांबलेल्या नागरिकांमुळे पदपथावर चालणे अशक्य झाले आहे. हा प्रकार सेक्टर १५ येथेही निदर्शनास येतो, मात्र येथेही अतिक्रमण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation given permission to firecracker stalls at kopar khairane sector 15 which causes traffic jam in the city css