नवी मुंबई : उद्यानांमधील ओल्या कचऱ्याचे सेंद्रिय खतात शास्त्रोक्त पद्धतीने रूपांतरण केले जात असल्याने नवी मुंबईतील उद्यान अधिक हिरवेगार आणि समृद्ध झाली आहेत. या प्रक्रियेतून तयार होणारे सेंद्रिय खत उद्यानांमधील वनस्पती, झाडे-झुडपे आणि हिरवळीसाठी वरदान ठरत आहे. यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊन, नैसर्गिक खत वापरास प्रोत्साहन मिळत असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेने दिली.

नवी मुंबई शहर हे उद्यानांचे शहर म्हणूनही ओळखले जात आहे. विविध उद्यानांमध्ये एकूण १२० सेंद्रिय खत निर्मिती केंद्रे निर्माण करण्यात आलेली आहेत. याठिकाणी पालापाचोळा, हिरवा कचरा आणि इतर सेंद्रिय कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन केले जाते. नैसर्गिक सेंद्रिय खत बनवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असून त्याकरिता विटा रचून चौरस किंवा आयताकृती आकाराचे लहान आकाराचे केंद्रे बनविण्यात येत आहे. यामध्ये मातीचा थर टाकला जातो. त्यानंतर त्यात कल्चर (जीवाणूयुक्त खत) टाकण्यात येते.

दररोज निर्माण होणारा हिरवा कचरा केंद्राध्ये टाकून ओले शेण मिश्रित पाणी शिंपडून त्याला नियमितपणे काटेरी उपकरणाने ढवळले जाते. साधारणत: ४५ दिवसांत चांगल्या प्रतीचे सेंद्रिय खत झाडांसाठी तयार होते. हे तयार झालेले खत झाडांना, हिरवळीसाठी, झाडे-झुडपे, गच्चीवरील कुंड्या व भाजीपाला उत्पादनासाठी वापरले जात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

पर्यावरण संवर्धनाच्या कृतीत नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यासोबतच प्लास्टिक किंवा इतर अविघटनशील कचरा ओल्या कचऱ्यात मिसळू नये असे आवाहनही करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रक्रियेचा वापर करून, प्रत्येक घरी ‘हरित टोपली’ तयार करावी व उपयोगात आणावी असे आवाहन करण्यात येत आहे.