पालिका अधिकाऱ्यांचे डोळे कान कशामुळे झालेत बंद
नवी मुंबई: नवी मुंबई शहर व आजुबाजुच्या परिसराला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून नवी मुंबई शहरात सीवूड्स स्थानकानजीक पूर्वेला होत असलेल्या परिसरात एल अॅन्ड टी कंपनीने पालिकेकडून कंपनीच्या सामाजिक दायित्व फंडातून या पदपथाची देखभाल व दुरुस्त करण्याची परवानगी मागितली होती. त्याप्रमाणे पालिकेने कंपनीला ९ अटी घातल्या असून त्या अटीं चक्क बासनात गुंडाळून सीवूड्स पूर्वेला चक्क फुटपाथच वाढवून २ फुटांच्या रस्त्याचाच चक्क पदपथ करुन टाकला आहे. विशेष म्हणजे पालिकेचे या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष असून पालिका अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करुनही पालिका अधिकारी कारवाईकडे दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे पालिका अभियंता विभाग व परवानगी देणारा नगररचना विभागाने एल अॅन्ड टी कंपनीपुढे आर्थिक लोटांगण घातले आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : ‘चालता बोलता स्वच्छता’ अभिनव उपक्रमातून नागरिकांमध्ये स्वच्छता जनजागृती
नवी मुंबई शहरात झपाट्याने व वेगवान पध्दतीने वाढणाऱ्या सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या पूर्व पश्चिम दिशेला सीवूड्स परिसरातील भव्य मॉल व कोटींची उड्डाणे घेणारा गृहनिर्माण प्रकल्प उभारला आहे. सीवूडस पूर्व दिशेला कंपनीने हजारो घरांचा प्रकल्प उभारला असून अद्याप या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. एल ॲन्ड टी कंपनीच्या या दिशेला असलेल्या फेज १ प्रकल्पातील इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. सीवूड्स सेक्टर २५ येथील या गृहनिर्मिती प्रकल्पाच्या बाजुलाच असलेल्या पदपथाचे सौंदर्यीकरण व देखभाल सामाजिक दायित्व फंडातून करण्यासाठी परवानगी मागीतली व पालिकेने त्यांना परवानगी दिली आहे. परंतू परवानगी दिल्या नंतर अधिकाऱ्यांचे चांगभल झाल्यानंतर याकडे पालिकेचे कोणीही अधिकारी फिरकत नसल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे कंपनीने सामाजिक दायित्व फंडाच्या नावाने पदपथाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेऊन चक्क पदपथच २ फूट रस्त्यात वाढवून रस्ताच छोटा केला आहे. ही बाब पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणल्यानंतरही पालिके्या अभियंता व नगररचना विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. याबाबत विभागातील नागरीक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही याबाबत तक्रार देऊनही पालिका मात्र दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे रस्त्यातच अतिक्रमण करुन पदपथ वाढवल्यानंतर पालिकेने घेतलेली मौनी बाबाची भूमिका संशयाच्या घेऱ्यात सापडली आहे.
हेही वाचा >>> सततच्या हवामान बदलामुळे शहरात सर्दी ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले
एल ॲन्ड टीचा प्रकल्प होत असलेल्या या भागात आधीच वाहतूककोंडीने व अरुंद रस्त्यामुळे नागरीक हैराण झाले असून त्यात पालिका चक्क रस्त्याचाच भाग गिळंकृत करुन पदपथ वाढवत असणाऱ्या कंपनीकडे कानाडोळा करत आहेत असा आरोप स्थानिक माजी लोकप्रतिनिधी यांनी केला आहे.तर शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी यांनीही पालिका आयुक्तांची भेट देऊन याबाबत तक्रार केली आहे. तर पदपथ सुभोभीकरणासाठी परवानगी देणाऱ्या नगररचना विभागाने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगीतले आहे.
महापालिकेचा अभियंता विभाग करतोय काय
पालिकेला याबाबत माहिती दिल्यानंतर पालिका अधिकारी चौकशी करुन कार्यवाही करण्याबाबत बाबूगिरीची उत्तरे देऊन तक्रार करणाऱ्यांकडे टाळाटाळ करत आहे.असल्याचा आरोप नागरीक करु लागले आहेत.
सीवूड् येथील रस्ता कमी करुन पदपथ वाढवला जात आहे.याबाबत पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.तरी कारवाई करत नाहीत. सर्व बेकायदा काम पूर्ण झाल्यानंतर पालिकेचे अधिकारी पाहणी करुन कार्यवाही करणार का ? त्यामुळे पालिकेचे अधिकारी एळ अॅन्ड टी कंपनीचे काम करतात की महापालिकेचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सलुजा सुतार , माजी स्थानिक नगरसेविका