रुग्णखाटांची व्यवस्थाही सज्ज
नवी मुंबई : देशात व महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नवी मुंबई महापालिकाही करोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरातील करोना चाचण्यांची संख्या वाढवली असून दिवसाला ३ हजार करोना चाचण्या करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. नागरीकांनी कोणतीही भिती बाळगण्याचे कारण नसून वाढत्या रुग्णसंख्येमुळे चाचण्यांवर भर दिला जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई: अनधिकृतपणे वाहन व्यवसाय करणाऱ्यांवर आरटीओची कारवाई
नवी मुंबई शहरामध्ये करोनाचे नवे रुग्ण तसेच उपचार घेत असलेले रुग्ण यांची संख्या कमी झाल्यानंतर शहरातील एकमेव सुरु वाशी प्रदर्शनी केंद्रही बंद केले होते.परंतू देशात पुन्हा दिवसाला ५ हजाराच्यावर करोना रुग्ण सापडत असल्याने पालिकाही सज्ज झाली आहे. खबरदारी म्हणून पालिकेने शहरातील सर्व नागरी आरोग्य केंद्र, तसेच पालिकेची रुग्णालये येथे चाचण्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहे. सर्दी, खोकला तसेच करोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ करोना चाचणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात व देशात वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येबाबत नुकतीच पालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बैठकही घेण्यात आली त्यात पालिका आयुक्तांनी संबंधित आरोग्य अधिकारी विभागाला शहरात करोनाच्या चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहे.
मागील दोन अडीच वर्षापूर्वी शहरात सुरु झालेल्या करोनामुळे शहरात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पालिकेने नागरीकांना योग्य आरोग्यसुविधा मिळण्यासाठी शहरात विविध ठिकाणी एकूण १३ करोना काळजी केंद्र सुरु केली होती.परंतू करोना रुग्णसंख्या व उपचाराधिन रुग्णसंख्या कमी होताच पालिकेने शहरातील १३ करोना काळजी केंद्र बंद केली होती.तसेच तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आलेल्या डॉक्टर व परिचारिकांची संख्याही कमी केली होती. चौथ्या लाटेत शहराची करोना रुग्ण संख्या अत्यंत नियंत्रणाता राहीली होती. सध्या पुन्हा एकदा करोनाची रुग्णसंख्या वाढत असून सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरीकांनी कोणतीही भिती बाळगण्याचे कारण नसल्याचे पालिका प्रशासनाने सांगीतले असून नागरीकांनी मात्र योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. शहरात सर्वच नागरी आरोग्य केंद्र तसेच नेरुळ, वाशी, ऐरोली येथील पालिका रुग्णलायतही चाचणी केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
हेही वाचा >>> नवी मुंबई: होमिओपॅथीला राजाश्रय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार; गणेश नाईक, आमदार
तसेच नवी मुंबई महापालिकेने शहरातील वाशी, नेरुळ, ऐरोली या ठिकाणी प्रत्येकी २० खाटांची व्यवस्था केली असून सिडको प्रदर्शनी केंद्र येथे ७५ आयसीयू बेडची व्यवस्था केली असल्याची माहिती पालिका प्रसासनाने दिली आहे.शहरात करोनाची स्थिती अतिशय नियंत्रणात असून देशात व राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे पालिकाही खबरदारी म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी सांगीतले.
नवी मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणून शहरात करोना चाचण्यांची संख्या वाढवली असून खबरदारी म्हणून पालिकेच्या रुग्णालयातही बेडची व्यवस्था केली आहे.सध्या करोना चाचण्यांची संख्या वाढवून ३ हजारापर्यंत करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.नागरीकांनी मात्र योग्य ती खबरदारी घ्यावी .
राजेश नार्वेकर, आयुक्त ,नवी मुबंई महापालिका
मागील काही दिवसातील शहरातील चाचण्यांची व रुग्णांची संख्या…
दिनांक. चाचण्या. करोनाबाधित
१ एप्रिल ३८९ १९
२ एप्रिल १६ ३०
३ एप्रिल ४८४ १०
४ एप्रिल १४ २८
५ एप्रिल ५४२ १९६
एप्रिल ४८१ २३