स्वतंत्र बैठक कक्षाची प्रभाग अध्यक्षांकडून मागणी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या आठ प्रभाग समितीच्या अध्यक्षांची दोन वर्षांपासून रखडलेली निवड प्रक्रिया पार पडली असली, तरी नवनिर्वाचित प्रभाग अध्यक्षांना बसण्यासाठी दालन नसल्याने विभाग अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मिळेल त्या जागी त्यांना बसावे लागत आहे. हीच परिस्थिती लोकप्रतिनिधींबाबत देखील असल्याने पालिकेच्या नियमावलीनुसार प्रभाग समिती कार्यालयात बसण्यासाठी किंवा चर्चेसाठी स्वतंत्र बैठक कक्ष असावे, या मागणीसाठी आता प्रभाग अध्यक्षांकडून थेट आयुक्तांकडेच विचारणा केली जाणार आहे.
महापालिका अधिनियमानुसार प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात प्रभाग अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा एक प्रमुख सदस्य म्हणून प्रभाग समिती अध्यक्षांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणे अनिवार्य आहे. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेची देखणी वास्तू उभ्या करणाऱ्या पालिका प्रशासनाचे प्रभाग कार्यालयाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आता नवनिर्वाचित अध्यक्षांना दालनासाठी शोधाशोध करावी लागत आहे. लोकप्रतिनिधींसाठी प्रभाग कार्यालयामध्ये आसनव्यवस्था नसल्याने यापूर्वी अनेकदा सभागृहात चर्चा होत असे.
परंतु दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सुचनेनुसार प्रभाग कार्यालयांमध्ये प्रभाग अध्यक्ष व लोकप्रतिनिधींसाठी बैठक कक्ष करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र प्रभाग समिती सदस्य व अध्यक्षांची निवड प्रक्रिया मागील दोन वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. मुळात, या कालावधीत पालिका प्रशासनाने भविष्यातील ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून याबाबत उपाययोजना हाती घेण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्याने नवनिर्वाचित अध्यक्षांना प्रभाग कार्यालयातच नागरिकांच्या समस्या उघडय़ावर बसून सोडवाव्या लागणार आहेत.
एकाच प्रभाग कार्यालयात स्वतंत्र दालन
नवी मुंबई महापालिका परिक्षेत्रातील दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखरणे, वाशी, तुभ्रे, नेरुळ, बेलापूर या प्रभाग समिती अंतर्गत १११ लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत. महापालिकेने प्रभाग कार्यालयासाठी मागील काही वर्षांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अनेक ठिकाणी रंगरंगोटी देखील केलेली नाही. तर प्रभाग अधिकारी, वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष व आसनव्यवस्था निर्माण केली आहे. मात्र प्रभाग समिती अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींसाठी ऐरोली ‘एच’ प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समित्यांत स्वतंत्र आसनव्यवस्था उभारण्यात आलेली नाही.
प्रशासनावरील अंकुशामुळे अधिकाऱ्यांची चालढकल
आठ प्रभाग समित्यांमध्ये पालिका प्रशासनाचे दुय्यम दर्जाचे अधिकारी व विभाग अधिकारी कारभार पाहण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. पंरतु या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आपले काम न झाल्यास अधिकाऱ्यांना इतर मार्गाने हाताशी धरून काम करून घ्यावे लागते. त्यामुळे या ठिकाणी लोकप्रतिनिधींचे दालन निर्माण झाल्यास पालिका अधिकाऱ्यांवर अंकुश आपोआपच बसणार असल्याने अनेक प्रभाग अधिकाऱ्यांनी जागा नसल्याचे कारण पुढे केल्याची चर्चा आहे.
ऐरोली प्रभाग समितीत स्वतंत्रपणे दालन उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. मुळात प्रभाग कार्यालयांमध्ये दोन वर्षांत पालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींसाठी व्यवस्था करणे अनिवार्य असतानासुद्धा त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही. ही अक्षम्य चूक असून सर्व प्रभाग समित्यांमध्ये तातडीने दालन उभारण्यासाठी आयुक्तांची भेट घेणार आहे.
–संजु वाडे,अध्यक्ष, ऐरोली (एच) प्रभाग समिती
महापालिका अधिनियमानुसार दोन वर्षांपूर्वी प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार प्रभाग कार्यालयांमध्ये प्रभाग अध्यक्ष दालन व लोकप्रतिनिधींसाठी बैठक व्यवस्था कक्ष कार्यान्वित करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अनेक ठिकाणचा अहवाल प्राप्त झाला असून येत्या आठवडाभरात उरलेल्या सात प्रभाग समितीमध्ये कक्ष उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
–अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त, नमुंमपा.