नवी मुंबई : नवी मुंबईकरांना मालमत्ता कर ऑनलाइन भरताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या अडचणी सोडविण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने ‘भारत बिल पेमेंट सिस्टिम’ (बीबीपीएस) ही प्रणाली सुरू केली आहे. प्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून ती पूर्णत: सुरक्षित आहे. या प्रणालीमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईत साडेतीन लाखांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता आहेत. नागरिकांना मालमत्ता कर भरता यावा यासाठी महापालिकेने विभाग कार्यालयात सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच ऑनलाइन भरणा करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. असे असले तरी नागरिकांना ऑनलाइन कर भरणा करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे ऑनलाइन कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये उदासिनता होती. त्यामुळे महापालिकेने आता ‘भारत बिल पेमेंट सिस्टिम’ ही नवी मालमत्ताकर प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्ता कराबाबतचा तपशील, थकीत रक्कम, कर भरण्याची अंतिम तारिख याबाबतची माहिती सहजरित्या उपलब्ध होणार आहे. या प्रणालीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून ती पूर्णत: सुरक्षित आहे. मालमत्ताधारकाची आर्थिक व व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले. मालमत्ताधारकांना एकाच क्लिकवर विविध प्रकारे मालमत्ताकर भरण्यासाठी सोय उपलब्ध झाली आहे.

असा कराल भरणा

‘भारत बिल पेमेंट सिस्टम’ प्रणालीमध्ये ऑनलाइन बँकिंग, यूपीआय, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाइल वॉलेट्स यासारखे विविध प्रकार उपलब्ध आहेत. नागरिक nmmc.gov.in या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून तसेच ‘माय एनएमएमसी’ या ॲपवरून घरबसल्या करभरणा करू शकतात. कराचा भरणा केलेली पावती नागरिकांना तात्काळ उपलब्ध होणार आहे.

तक्रार निवारण

मालमत्ताधारकांना मालमत्ता करासंदर्भातील तक्रारींचा निपटारा, शंकाचे निरसन व मालमत्ताकराबाबतची माहिती मिळविण्यासाठी ०२२-६२५३१७२७ हा विशेष मदत क्रमांक सुरु करण्यात आला आहे. नागरिकांनी सोमवार ते रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून आपल्या तक्रारींचे निराकरण करून घेण्याचे आवाहन मालमत्ता कर विभागाने केले आहे.

मालमत्ता धारकांना कराचा भरणा सहजपणे करता यावा व त्यांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी ‘भारत बिल पेमेंट सिस्टम’ या प्रणालीचा मालमत्ता कर विभागाने अवलंब केला आहे. जुन्या प्रणालीमधील सर्व त्रुटी दूर करण्याकडे विशेष लक्ष दिल्याने ऑनलाइन कर भरणा प्रक्रिया अधिक सुलभ व जलद झालेली आहे. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता मालमत्ताकर विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. डाॅ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.