नवी मुंबई : नवी मुंबई शहरात ‘कार्यक्षम व शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली’ आणि ‘कॅन्सर विषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली’ अशा दोन्ही प्रकल्पांची पालिका प्रशासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून याबद्दल नवी मुंबई महापालिकेस देशातील प्रतिष्ठित ‘स्कॉच’ पुरस्काराने नवी दिल्ली येथील ‘स्कॉच समीट’च्या १०० व्या विशेष समारंभात सन्मानीत केले.

भारताला एक उत्तम आणि समर्थ राष्ट्र बनविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या व्यक्ती, संस्थांना ‘स्कॉच’ पुरस्कार प्रदान करून राष्ट्रीय पातळीवर सन्मानीत करण्यात येते. स्कॉच पुरस्कारांची निवड पद्धती अत्यंत पारदर्शक असून यामध्ये तज्ज्ञांकडून प्रकल्प समीक्षा करण्यात येते. जाणकार समीक्षकांव्दारे तपासणी आणि फेरतपासणी करण्यात येते. तसेच अभ्यासू नागरिकांकडून मतदान पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. अशा वेगवेगळ्या कसोट्या पार करून सुयोग्य व्यक्ती वा संस्थांना पुरस्कारास पात्र समजले जाते. या काटेकोर मूल्यमापनातून नवी मुंबई महापालिकेचे ‘कार्यक्षम व शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली’ आणि ‘कॅन्सर विषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली’ हे दोन प्रकल्प मानाच्या ‘स्कॉच’ अंतिम पुरस्कारास पात्र ठरले आहेत.

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे सचिव अजय सेठ, स्कॉच समुहाचे अध्यक्ष समीर कोच्छर यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्कॉच समुहाचे संचालक डॉ. दीपक फाटक आणि उपाध्यक्ष डॉ. गुरशरण धंजल यांच्या हस्ते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी हे राष्ट्रीय मानाचे दोन ‘स्कॉच’ पुरस्कार स्विकारले. अशाप्रकारे एकाच वेळी महापालिकेच्या दोन उल्लेखनीय प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने नावाजले जाणे ही नवी मुंबईकरांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रीया आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे हे उपस्थित होते.

नवी मुंबई शहरात ८५ टक्के नळजोडण्यांना जलमापके बसविण्यात आलेले आहेत. पाण्याच्या सुयोग्य वापरावर काटेकोर लक्ष दिले जात आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी आधुनिक मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत पाण्याच्या वापरावर भर दिला जात आहे. त्याचप्रमाणे अत्याधुनिक टर्शिअरी ट्रिटमेट प्लान्टमधील ५० द.ल.लि. पुनर्प्रक्रियायुक्त पाणी उद्योगसमुहांना देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच ९६ टक्के पाणी देयकांची वसूली होत आहे. अशाप्रकारे जलव्यवस्थापनासोबतच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे, असे आयुक्त आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त सांगितले.

सद्यस्थितीत कॅन्सरचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विशेषत्वाने महिलांच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष टाळण्यासाठी ‘कॅन्सर विषयक काळजी घेणारी कार्यप्रणाली’हा प्रकल्प महापालिकेने सुरू केला आहे. महापालिकेच्या स्थानिक पातळीवरील सर्व २६ नागरी आरोग्य केंद्रात आणि रूग्णालयात कॅन्सरविषयक प्राथमिक तपासणी केली जात असून संशयित रूग्ण आढळल्यास त्यांना नामांकित टाटा कॅन्सर रूग्णालयात पुढील उपचारासाठी संदर्भित केले जात आहे. तशा प्रकारचा सामंजस्य करार झालेला असून आत्तापर्यंत १० हजारहून अधिक महिलांची कॅन्सरविषयक तपासणी करण्यात आली आहे. त्यामधील ५ महिलांमध्ये लक्षणे आढळल्याने पुढील उपचारासाठी टाटा रूग्णालयाकडे संदर्भित करण्यात आले आहे. सर्वसामान्य रूग्ण केमोथेरपी उपचारापासून पैशांअभावी वंचित राहू नये यादृष्टीने महापालिकेच्या नेरूळ रूग्णालयात विशेष केमोथेरपी कक्ष सुरू करण्यात आला आहे, असे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त सांगितले.