नवी मुंबई : नवी मुंबईत पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षामुळे सीवूड्स विभागात चक्क गटाराच्या पाण्याच्या शेजारीच बेकायदा धोबीघाट थाटल्याचे चित्र असून त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवी मुंबई शहरात अनधिकृत बहुमजली इमारतींची संख्याही मोठी आहे. नवी मुंबई महापालिका फक्त नोटीस बजावून संबंधित सदनिका अनधिकृत असून या ठिकाणी नागरिकांनी सदनिका खरेदी करू नये असे आवाहन करते. परंतु याच अनधिकृत कामामुळे हजारो नागरिकांची फसवणूक होत असल्याचे चित्र आहे. शहरातील बेकायदा बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून तोडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. परंतु पालिका अधिकाऱ्यांकडून याबाबत काणाडोळा केला जात आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात प्रस्ताव, शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेशाचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा सरकारला जागा दाखवू

सीवूड्स येथील टोलेजंग इमारती असणाऱ्या सीवूड्स सेक्टर २५ येथे नवी मुंबई महापालिकेचे मलनि:सारण उदंचन केंद्र आहे. या केंद्राच्या बाजूलाच तुर्भे, एलपी, नेरुळ सेक्टर १९ सेक्टर २१, सेक्टर २५ मार्गे गटाराचे पाणी वाहून नेणारा मोठा नाला सेक्टर ५० मार्गे खाडीला मिळतो. पालिकेच्या नेरुळ सेक्टर २५ येथील मलनि:सारण केंद्राच्या नाल्याकडील भिंतीच्या मदतीने या परिसरात बेकायदा धोबीघाट थाटलेला आहे. तसेच याच पालिका मलनि:सारण केंद्राच्या भिंतीचा आधार घेत बेकायदा घोड्यांचा पागा थाटलेला आहे. या धोबीघाटाच्या ठिकाणी नवी मुंबईतील विविध भागांतून इस्त्री तसेच ड्रायक्लिन करण्यासाठी येणारे महागडे कपडे या बेकायदा धोबीघाटावर आणले जातात. त्यामुळे या ठिकाणी येणारे कपडे नक्की कुठल्या पाण्यावर धुतले जातात असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच ठिकाणी मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर होतो.

अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

नवी मुंबई शहरात अशाच प्रकारे बेलापूर ते दिघा विभागात जिथे जागा मिळेत तिथे जागा अडवल्या जात असल्याचे चित्र आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणांना पालिका, सिडको, एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळेच देखण्या नवी मुंबईत बकालपणाचे चित्र पाहायला मिळते.

हेही वाचा…पत्नीवर अ‍ॅसीड हल्ला, पनवेल तालुक्यातील घटना

सीवूड्स येथील पालिकेच्या मल उदंचन केंद्राभोवती झालेल्या बेकायदा धोबीघाट, घोड्यांचा पागा, बेकायदा झोपड्या याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून पाडकामाची कारवाई करण्यात येईल. – शशिकांत तांडेल, सहाय्यक आयुक्त बेलापूर विभाग

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation s negligence to illegal dhobi ghat psg