लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागातर्फे विविध घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्याअंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती योजनेकरिता सहा घटकांतर्गत येणाऱ्या ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांना पालिकेच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात आली. यामध्ये २७ कोटी ९९ लाख ५७ हजार २०० रूपये इतक्या रकमेच्या वितरण शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करण्यात आले.

आर्थिकदृष्ट्या कुटुंब दुर्बल असल्याने अनेक हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाच्यावतीने अशा घटकातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. त्याच प्रकारे नवी मुंबई महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात आली. यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये सहा घटकांतर्गत एकूण ४३ हजार ७९१ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले होते.

पालिकेच्यावतीने या अर्जांची पडताळणी करण्यात आली. त्यापैकी ३६ हजार १०४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पालिकेकडून एकूण २७ कोटी ९९ लाख ५७ हजार २०० रूपये रकमेचे वितरण करण्यात आले. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे ही रक्कम जमा करण्यात आली.

योजना कोणासाठी?

ही योजना खासगी शाळांमध्ये आरटीई प्रवेशाव्यतिरिक्त शिक्षण घेणाऱ्या, ८ लाखांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आहे. याव्यतिरिक्त मागासवर्गीय विद्यार्थी, स्थानिक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील विद्यार्थी, महापालिका क्षेत्रातील सफाई कामगार व कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कामगारांची मुले, विधवा, घटस्फोटित महिलांची मुले तसेच महापालिका क्षेत्रातील दगडखाण, बांधकाम, रेती, नाका कामगारांची मुले यांना या शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते.

शिष्यवृत्ती रक्कम

इयत्ताशिष्यवृत्ती
पहिली ते चौथी (प्राथमिक)४ हजार रूपये
पाचवी ते सातवी (माध्यमिक)६ हजार रूपये
आठवी ते १० वी (उच्च माध्यमिक) ८ हजार रूपये
११वी ते १२ वी ( विद्यालयीन)९ हजार ६०० रूपये
महाविद्यालयीन ते पदवी१२ हजार रूपये
पदव्युत्तर शिक्षण १६ हजार रूपये
तांत्रिक / व्यवसाय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी८ हजार रूपये