नवी मुंबई- नवी मुंबई महापालिकेची स्थापना ३० वर्षापूर्वी झाली.तेव्हापासून नवी मुंबई महापालिकाक्षेत्रात पालिकेने केलेल्या दर्जेदाक कामामुळे नवी मुंबई शहराला महाराष्ट्रात व देशात नावलौकीक मिळालेला आहे. नवी मुंबई शहर देशात स्वच्छतेतही आघाडीवर आहे. परंतू याच शहरात विविध शासकीय आस्थापनांच्या परवानगीमुळे अनेक कामे नियमांच्या चौकटीमुळे अडकलेली आहेत. एकीकडे सीआरझेड तसेच काही ठिकाणी एमसीझेडएमच्या परवानगीविना विकासात्मक कामांना अडथळा येतो. नवी मुंबई सर्वाधिक वेगाने विकसित झालेला परिसर म्हणजे सीवूडस .याच सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या नजिक सेक्टर ५० पन्नास येथे पालिका स्थापनेपासूनच नवी मुंबई पालिका मुख्यालयाकडे जाणारा नाल्यावरील पूल अर्धवट स्थितीत आहे.त्यामुळे एकाच दिशेच्या मार्गावर दोन्हीकडील वाहतूक सुरु आहे,परंतू जवळजवळ ३० वर्षानंतर हा नाल्यावरील पूल दृष्टीक्षेपात येईल असे चित्र आहे.एमसीझेडएम कडून याठिकाणचे काम करण्यास हिरवा कंदिल मिळाला असून पालिकेने येथील कामासाठी ६ कोटीच्या कामाचा प्रस्तावही तयार ठेवला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
नवी मुंबई महापालिका स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने नागरीसुविधां,जागा सिडको प्राधिकरणाकडून पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आल्या. नवी मुंबई शहरात नवी मुंबई महापालिकेने या शहराचा विकासात्मक बदल घडवून आणला.परंतू सिडको व पालिका यांच्यात अद्यापही विविध प्रकरणावरुन सातत्याने शीतयुध्द सुरु असते. आता विकास आराखड्यावरुन तू तू मै मै सुरु आहे. सीवूड्स सेक्टर ५० येथे एल अन्ड टी कंपनीच्याद्वारे सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपुल बनवला.याच उड्डाणपुलाच्याजवळ सेक्टर ५० मधून पालिका मुख्यालयाकडे जाणारा एकाच दिशेचा नाल्यावरील पुल पूर्ण असून दुसरीकडे गेल्या ३० वर्षापासून कांदळवनामुळे पूल अर्धवट आहे. सिडको काळापासून हा अर्धवट असलेला पूल तसाच आहे. आता याच सीवूड परिसरात मॉलमुळे वाहनांची मोठी वर्दळ वाढली असून या एकाच मार्गावरुन दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक सुरु असल्यामुळे अपघाताची मोठी शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वारंवार हा अर्धवट उड्डाणपुल पूर्ण करण्याची मागणी केली परंतू एमसीझेडएमच्या परवानगीविना हा पुल अर्धवट स्थितीतच आहे. परंतू आता पालिकेने सततच्या प्रयत्नातून एमसीझेडएमकडून संबंधित पुलाबाबतची स्कूटनी करण्याबाबतचे २ लाख रुपये भरण्याचे पत्र प्राप्त झाले असून लवकरच यापूलाचा मार्ग निकालात निघणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. अर्धवट बनवलेल्या नाल्यावरील पुलाचा वापर गाड्या पार्किंगसाठी केला जात आहे. या नाल्यावरील पुलाच्या कामासाठी पालिकेने जवळजवळ ६ कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावही तयार केला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी लोकसत्ताला दिली.
सिडकोकाळापासून रखडलेला नाल्यावरील पूल प्रत्यक्षात येणार.
सीवूड्स सेक्टर ५० येथील सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाखालून पालिका मुख्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेला नाल्यावरील उड्डाणपुल लवकरच दृष्टीक्षेपात येणार आहे, कांदळवन असल्याने सिडकोने दुर्लक्षित केलेला उड्डाणपुल सततच्या पाठपुराव्यानंतर करण्यात येणार आहे. एमसीझेडएमकडून स्कूटनी फी देखील भरण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. लवकरात लवकर हा पूल करण्यासाठी पालिका सज्ज आहे.
संजय देसाई, शहर अभियंता,नवी मुंबई महापालिका