नवी मुंबई : संपूर्ण ॲागस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यातही हवा तसा पाऊस होत नसल्यामुळे नवी मुंबई महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग सावध झाला असून दरडोई दोनशे लिटरपेक्षा अधिक पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या वसाहतींची शोधमोहीम नव्याने सुरू करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात सीबीडी आणि नेरुळ येथील १३ मोठ्या वसाहतींमध्ये पाण्याचा बेसुमार वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यापैकी काही वसाहतींना जादा पाणीवापराबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका हद्दीत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक पाण्याचा पुरवठा मोरबे धरणातून होत असतो. मोरबे धरणातून आणण्यात येणाऱ्या पाण्याचा पहिला टप्पा सीबीडी-बेलापूर, सीवूड्स आणि नेरुळ या तीन उपनगरांमध्ये असल्याने या ठिकाणी अधिक दाबाने आणि पुरेसा पाणीपुरवठा होत असतो. वाशीपर्यंत पाणीपुरवठ्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी कोपरखैरणे, तुर्भ्याचा काही भाग, ऐरोली आणि दिघा या उपनगरांमध्ये मात्र दरडोई पाणीवापराचे प्रमाण कमी होत जाते.
हेही वाचा : उरण: ओएनजीसी तेल बाधितांचा मोर्चा; टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनानाचा निषेध
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून महापालिकेस पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे त्याचा फटका दिघा, ऐरोली आणि तुर्भे स्टोअर या भागाला बसत आहे. वितरण व्यवस्थेतील त्रुटी कमी करण्याचे आव्हान एकीकडे पाणीपुरवठा विभागासमोर असताना काही उपनगरांमधील ठरावीक वसाहतींमध्ये होणारा भरमसाट पाण्याचा वापर ही या विभागासमोरील मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे.
हेही वाचा : एपीएमसी बाजार समिती शीतगृह देणार भाड्याने
मन मानेल तसा पाण्याचा वापर
जुलै महिन्यात उत्तम पाऊस झाल्याने मोरबे धरणात सध्या मुबलक पाणीसाठा असला तरी ॲागस्ट महिन्यात पावसाने घेतलेली ओढ आणि सप्टेंबर महिन्यातही पुरेसा पाऊस नसल्यामुळे पाणीपुरवठा विभागाची चिंता वाढली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या विभागाने शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमधील पाणीवापराचे सर्वेक्षण हाती घेतले असून यातून काही धक्कादायक निष्कर्ष पुढे येऊ लागले आहेत.
हेही वाचा : अपंग व्यक्तीचा स्टॉलसाठी पनवेल पालिकेसमोर रॉकेल अंगावर घेण्याचा प्रयत्न
मोरबेच्या पाण्याचा पहिला टप्पा असणाऱ्या सीबीडी-बेलापूर आणि नेरुळ उपनगरातील १३ वसाहतींमधील रहिवाशांकडून दरडोई २०० ते २१० लिटरपेक्षाही अधिक पाण्याचा वापर होत असल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. बेलापूर आणि नेरुळ ही दोन्ही उपनगरे पाणी वापरात आघाडीवर असताना काही ठरावीक वसाहतींमध्ये हा वापर अनिर्बंध पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा वापर कमी व्हावा यासाठी महापालिकेने अशा वसाहतींना नोटिसा बजाविणे सुरू केले असून पाण्याचे हे लेखापरीक्षण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी मोहीम हाती घेतली जात आहे.
हेही वाचा : पनवेल पालिकेच्या ३७७ जागांसाठी १ लाख १५ हजार अर्जांची नोंदणी; अर्ज नोंदणीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक
दरडोई दोनशे लिटरपेक्षा अधिक वापर करणाऱ्या वसाहती
- प्लाॅट क्रमांक – ३५ सेक्टर १५ सीबीडी
- प्लाॅट क्रमांक – ४४-४५ सेक्टर १५ सीबीडी
- प्लाॅट क्रमांक – ९२-९५ सेक्टर १५ सीबीडी
- एनआरआय काॅम्प्लेक्स, सेक्टर ५४ नेरुळ
- प्लाॅट क्रमांक ८३ सेक्टर ५० नेरुळ
- प्लाॅट क्रमांक १२१ सेक्टर ५० नेरुळ
- प्लाॅट क्रमांक १२३ सेक्टर ५० नेरुळ
- प्लाॅट क्रमांक १२० सेक्टर ५० नेरुळ
- निलगिरी गार्डन गृहनिर्माण संस्था, सेक्टर २४ सीबीडी
- एकता विहार सेक्टर २५ सीबीडी
- प्लाॅट क्रमांक ३०२ सेक्टर २१ नेरुळ
- प्लाॅट क्रमांक १२८-१३१ सेक्टर २१ नेरुळ
- प्लाॅट क्रमांक ७७ सेक्टर २७ नेरुळ
‘दरडोई दोनशे लिटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर करणाऱ्या वसाहतींना नोटिसा बजाविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासन निकषानुसार दरडोई १५० लिटर इतका पाणीवापर अपेक्षित धरण्यात आला आहे. असे असताना २०० लिटरपेक्षा अधिक पाणीवापर हा सध्याच्या परिस्थितीत नियमांना धरून नाही. त्यामुळे पाणीवापराचे नव्याने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे’, असे नवी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे. ‘नवी मुंबईत काही वसाहतींमध्ये पाण्याचा अधिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. येत्या काळात विभागवार पद्धतीने पाणीवापराचे लेखापरीक्षण (ॲाडिट) करण्याची आवश्यकता भासू शकते. त्याविषयी आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत’, अशी प्रतिक्रीया नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.